पुण्यात बिल्डर देवेंद्र शहांची गोळी घालून हत्या

शहा बाहेर आल्यावर त्यांच्यावर 5 गोळ्या झाडण्यात आल्या. मुलावर मात्र हल्ला करण्यात आला नाही. हल्लेखोर सध्या फरार आहेत. बिल्डरच्या व्यवसायाव्यतिरिक्त शहा जमीन खरेदीचाही व्यवसाय करायचे.

Sonali Deshpande
पुणे, 14 जानेवारी : पुण्यातले नामांकित बिल्डर देवेंद्र शहांची काल रात्री साडे अकराच्या सुमाराला त्यांच्या घराबाहेर निर्घृण हत्या करण्यात आली. प्रभात रोडवर त्यांचं घर आहे. दुचाकीवरून आलेल्या 2 अज्ञात गुन्हेगारांनी शहांना बाहेर बोलावलं. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगाही होता.शहा बाहेर आल्यावर त्यांच्यावर 5 गोळ्या झाडण्यात आल्या. मुलावर मात्र हल्ला करण्यात आला नाही. हल्लेखोर सध्या फरार आहेत. बिल्डरच्या व्यवसायाव्यतिरिक्त शहा जमीन खरेदीचाही व्यवसाय करायचे. त्याच्यातल्याच एका वादामुळे त्यांची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. शहा मूळचे मुंबईचे. 14 वर्षांपूर्वी ते पुण्यात स्थायिक झाले होते.अंबिका ग्रुप ऑफ रिअल इस्टेट नावाने त्यांचा व्यवसाय आहे. काल रात्री अकराच्या सुमारास शहा हे त्यांच्या प्रभात रोडवरील गल्ली नंबर 7 सायली अपार्टमेंट येथील राहत्या घरी होते. यावेळी दुचाकीवरील आलेल्या दोन अनोळखी इसमांनी अपार्टमेंटमधील खाली असलेल्या इस्त्री दुकानदाराला शिविगाळ करून शहा यांना खाली बोलवून आणण्यास सांगितले. त्यावेळी त्यांनी हा प्रकार शहा यांना सांगितला. हे ऐकूण शहा आणि त्यांचा मुलगा दोन्हीही लिफ्टमधून खाली आले.

शहा बाहेर येताच दोन्ही आरोपींनी लागोपाठ 5 गोळ्या झाडल्या. त्यापैकी एक गोळी शहा यांच्या कमरेत आणि दुसरी छातीत लागली. गोळीबार करून दोघेही दुचाकीवरून फरार झाले. या हल्ल्यात जखमी झालेल्या शहा यांना तातडीने पुना हॉस्पिटल येथे उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Trending Now