पुणे पोलीस
वैभव सोनवणे, प्रतनिधी पुणे, 18 जुलै : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वी पोलिसांच्या रात्रीच्या गस्तीमध्ये गाडी चोरताना आढळलेल्या दोन आरोपींना कोथरूड पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. या आरोपींच्या घर झडतीत कुऱ्हाड मिळून आली असून लॅपटॅापमध्ये देशविघातक साहित्य असल्याचा संशय आहे. दरम्यान, या घटनेनंतर एटीएस विभागाचे अधिकारी, पुणे पोलीस आयुक्त यांच्यासह वरिष्ठ अधिकारी कोथरूड पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. काय आहे प्रकरण? कोथरूड येथे दोन दिवसांपूर्वी पोलिसांच्या नाकाबंदी दरम्यान ताब्यात घेण्यात आलेल्या दोघा संशयितांकडे देशविधातक कृत्याचा संशयावरून कसून चौकशी सुरू आहे. या नाकाबंदीदरम्यान दोघा संशयितांचा तिसरा साथीदार पळून गेला असून त्याचा शोध सुरू आहे. या तिसऱ्या साथीदाराच्या कोंढवा परिसरातील घरात शोध घेण्यात आला असून लॅपटॅाप, कुऱ्हाड ताब्यात घेण्यात आली आहे.
या लॅपटॅापमध्ये देशविधातक कृत्यांसंदर्भात काही माहिती असल्याचा संशय पोलिसांना आहे. तसेच मध्य प्रदेशातील काही देशविधातक कृत्यांमध्ये त्यांचा सहभाग असल्याचाही संशय आहे. या पार्श्वभूमीवर एटीएस, गुप्तचर यंत्रणा त्या तिसऱ्या साथीदाराचा शोध घेत आहेत. पोलीस आयुक्त, सह पोलीस आयुक्तांसह सगळे वरिष्ठ अधिकारी कोथरूड पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत.