विराट कोहलीला चिंता 'चौथ्या'ची

भारत आणि इंग्लंड दरम्यान आज तिसरा निर्णायक सामना खेळण्यात येणार आहे. या सामन्यात कर्णधार विराटची सर्वात मोठी डोकेदुखी काही असेल तर ती म्हणजे चौथ्या क्रमांकावर कोणत्या खेळाडूला पाठवायचं... क्रिकेट विश्वचषक स्पर्धेला अजून एक वर्ष आहे. पण चौथ्या स्थानावर नेमकी कोणत्या खेळाडूला खेळवायचे हे विराट कोहली आणि त्याची संपूर्ण टीम निश्चित करु शकत नाही. विराटकडे चौथ्या स्थानावर खेळवण्यासाठी पाच पर्याय उपलब्ध आहेत. कोहलनीने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात केएल राहुलला संधी दिली होती. पण राहुलने फार काही चांगले प्रदर्शन केले नाही.

कोहलीकडे धोनीच्या रुपात दुसरा पर्याय उपलब्ध आहे. पण लॉर्ड्सवर त्यानेही विराटची सपशेल निराशा केली होती. एमएस धोनीसारख्या खेळाडूनेही निराशा केल्यामुळे विराटला चौथ्या स्थानावर कोणाला पाठवावे याची चिंता लागून राहिली आहे. दिनेश कार्तिक सध्या त्याच्या करिअरच्या उत्तम फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे चौथ्या स्थानासाठी सध्या त्याच्याकडे पाहिले जात आहे. पण अजून कार्तिकला पुरेशी संधी देण्यात आलेली नाही. मुंबईचा श्रेयस अय्यरही या शर्यतीत पळताना दिसत आहे. करिअरच्या पहिल्या सहा सामन्यांमध्ये श्रेयसने दोनदा अर्धशतकी खेळी केली होती. त्यामुळे वर्ल्डकपआधी अय्यर चौथ्या स्थानावर खेळण्यास योग्य आहे की नाही हे पडताळून पाहण्यासाठी इंग्लंड मालिका सोयीस्कर ठरेल. या शर्यतीत सुरेश रैनाकडे कानाडोळा करता येऊ शकत नाही. टीम इंडियामध्ये कमबॅक केल्यानंतर तो तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावरच फलंदाजी करत आहे. त्यामुळे आज खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात कोहली कोणत्या खेळाडूला चौथ्या स्थानावर खेळण्याची संधी देणार हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे.

Trending Now