PHOTOS : आरके स्टुडिओच्या या महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?

मुंबईतली आणखी एक ऐतिहासिक वास्तू काळाच्या पडद्याआड जाणार आहे. हिंदी चित्रपटसृष्टीच्या अनेक घटनांचा साक्षीदार असलेला चेंबूरचा आर.के. स्टुडिओ आता विकण्यात येणार आहे. या स्टुडिओला लागलेल्या भीषण आगीनंतर या वास्तूचं आणि त्यात संग्रहीत केलेल्या आठवणींचंही नुकसान झालं. त्यामुळे आता हा स्टुडिओ विकणं योग्य ठरेल असा निर्णय कपूर कुटुंबीयांनी घेतलाय. दिवंगत अभिनेते राज कपूर यांच्या पत्नी कृष्णा राज कपूर, मुलं रणधीर, ऋषी आणि राजीव आणि मुलगी रितू नंदा आणि रिमा जैन यांनी एकमतानं हा निर्णय घेतलाय. स्टुडिओतून मिळणारं उत्पन्न तुलनेनं कमी असून त्याच्या देखभालीसाठी होणारा खर्चच जास्त असल्यामुळे ते या निर्णयावर पोहोचल्याचं स्पष्ट करण्यात आलंय.

राज कपूर यांच्या 90 टक्के सिनेमांची शूटिंग्ज या स्टुडिओत झाली. पण हल्ली या स्टुडिओत कुणी शूटिंग फारसं करत नाही. सगळे जण गोरेगाव, अंधेरी इथे शूटिंग करतात. म्हणून हा स्टुडिओ विकण्याचा निर्णय कपूर कुटुंबानं घेतलाय. राज कपूर स्टुडिओत नर्गिस इन हाऊस हिराॅइन होती. तिनं बरेच पैसे राज कपूरच्या सिनेमात ओतले होते. आग सिनेमात राज कपूर आणि नर्गिस एकमेकांच्या बाहुपाशात आहेत, असं अजरामर दृश्य होतं. तोच स्टॅच्यु आरकेचं प्रतिक बनला. आरके स्टुडिओत आग सिनेमापासून शूटिंगला सुरुवात झाली, ती बरसात, आवारा, श्री 420, जिस देस मे गंगा बहती है अशा असंख्य एव्हरग्रीन सिनेमांची शूटिंग्ज इथे झाली. ऋषी कपूरनी आपल्या आठवणींमध्ये सांगितलंय, जिस देश मे गंगा बहती है सिनेमातल्या पद्मिनीचे कपडे, दागिने अजून स्टुडिओत आहेत. 40 ते 50च्या दशकात चेंबुरमध्ये फक्त संध्याकाळी वीज असायची. म्हणून सिनेमांची शूटिंग्ज संध्याकाळी सुरू होऊन रात्रभर चालायची. सत्यम शिवम सुंदरम सिनेमातला क्लायमॅक्सचा पूरही इथेच शूट झाला, तर यश चोप्रांच्या सुपरहिट काला पत्थरमध्ये खाणीत पाणी भरतं, हे दृश्यही इथेच शूट झालं. राज कपूरनी आपली सगळी कमाई स्टुडिओतच ओतली. सिनेमा हाच त्यांचा धर्म होता. बाॅबीच्या यशानंतर त्यांनी पहिलं घर खरेदी केलं होतं. आरकेचा गणेशोत्सवही प्रसिद्ध होता. गणपतीला सगळं कपूर कुटुंब एकत्र यायचं. अगदी आता रणबीरपर्यंत ही परंपरा सुरू आहे. 16 सप्टेंबरला लागलेल्या आगीत स्टुडिओचं बरंच मोठं नुकसान झालं होतं. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला. अर्थात, राज कपूर आणि त्यांचे सिनेमे हा इतिहास आहे. ही वास्तूही ऐतिहासिक आहे. त्यामुळे उद्या त्या जागी कदाचित उंच टाॅवर्स,माॅल्स उभे राहतीलही. पण एक इतिहासच असा इतिहासजमा होतोय बघून सगळेच जण हळहळ व्यक्त करतायत. 

Trending Now