गणपती आणि माझी मैत्री आहे - हर्षदा खानविलकर

यंदाच्या गणेश चतुर्थीसाठी कलर्स मराठीच्या संपूर्ण परिवाराने जय्यत तयारी केली आहे. वाहिनीवरील कलाकारांनी गणेश चतुर्थीच्या निमित्ताने त्यांच्या आठवणी, अनुभव वाचकांसोबत शेअर केले असून धुमधडाक्यात गणरायाचे स्वागत केलं. तसंच पुढच्या वाटचालीसाठी आशीर्वाद देखील घेतले.

घाडगे & सून मालिकेतील प्रेक्षकांची लाडकी अमृता म्हणजेच भाग्यश्री लिमये- गणेशोत्सव म्हणजे माझ्यासाठी उत्साहाला उधाण आणणारा समाजभिमुख करणारा सण. आमच्या कॉलनीत आम्ही गणपती बसवायचो. रात्री गणपतीच्या आरतीला झांजा वाजवायला मला खूप आवडायचं. रात्री आरती झाल्यावर सर्वांना प्रसाद वाटायचा आणि उरलेला प्रसाद सर्वांच्या घरी पोहचता करायचं काम आम्हा छोट्या मंडळींवर होतं. ‘लक्ष्मी सदैव मंगलम्’मालिकेमधील मल्हार म्हणजेच ओमप्रकाश शिंदे - मी लहान असताना आमच्या गावी सार्वजनिक मंडळाचा गणपती असायचा. तेव्हा आरतीला दिला जाणारा प्रसाद रोज वेगवेगळ्या घरातून जायचा. आमच्या घरातून जेव्हा प्रसाद द्यायचा असायचा तेव्हा मी बराच प्रसाद मंडळात पोहचवण्यापूर्वीच फस्त करायचो. अर्थात घरी कळू न देता. 'लक्ष्मी सदैव मंगलम'मधील लक्ष्मी म्हणजेच समृद्धी केळकर - मला आवडणाऱ्या उत्सवांपैकी एक म्हणजे गणेशोत्सव. या काळात सगळीकडे आनंदाचं आणि चैतन्यपूर्ण वातावरण असतं. आमच्याकडे बाप्पा बसत नाही तरी सुद्धा मी माझ्या आत्याकडे आणि मावशीकडे जाऊन बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी करते. मी नेहमी बाप्पा आला की त्याच्यासमोर आम्हाला कथ्थक सादर करते. एका अर्थाने हा नमस्कारच असतो.

'नवरा असावा तर असा'मधली हर्षदा खानविलकर - माझा स्वभाव खूप श्रध्दाळू आहे. माझ्या घरात बरेच छोटे मोठे गणपती आहेत, जे मला भेट म्हणून मिळाले आहेत. दर मंगळवारी मला कोणी ना कोणीतरी भेट म्हणून गणपती देतं. ही माझी श्रध्दा आहे की दर मंगळवारी मला बाप्पा भेट देतो. माझी आणि गणपतीची मैत्री आहे, मी त्याला माझा खूप मोठा आधार मानते.

Trending Now