छत्रीवाली मधुरा सांगतेय बाप्पाच्या आठवणी

एतशा संझगिरी (छोटी मालकीण मालिकेतली रेवती)- मी मुळची परेलची. गिरणगावातच लहानाची मोठी झाल्यामुळे गणेशोत्सवाचा वेगळा उत्साह असतो. माझ्या सोसायटीच्या गणपतीला आम्ही सगळेजण खूप धमाल करतो. आमच्याकडे दरवर्षी मोदक खाण्याची स्पर्धा असते. मी या स्पर्धेत दरवर्षी भाग घेते. बाप्पाने आजवर मला न मागता खूप गोष्टी दिल्या आहेत. त्याचा वरदहस्त माझ्या पाठीशी राहो हेच मागणं मागेन. संकेत पाठक (छत्रीवाली मालिकेतील विक्रम) -
मी मूळचा नाशिकचा. माझ्या घरी गौरी-गणपती असतात. इकोफ्रेण्डली गणेशोत्सव साजरा करण्याचा माझा आणि माझ्या कुटुंबाचा प्रयत्न असतो. माझी आई दरवर्षी घरीच कागदापासून गणपतीची मूर्ती तयार करते. मीही तिला मदत करतो. निसर्ग जपा तरच तो तुमचं रक्षण करेल हा संदेश मला माझ्या कुटुंबाकडून लहानपणापासून मिळत आलाय आणि तोच मी माझ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू इच्छितो. अक्षर कोठारी (छोटी मालकीण मालिकेमधील श्रीधर) - माझं बालपण सोलापुरातल्या माणिक चौकात गेलं. तिथे आजोबा गणपतीचं मंदीर सुप्रसिद्ध आहे. या गणपतीला सुमारे १३२ वर्षांची परंपरा आहे. गणेशोत्सवाच्या काळात आम्ही बाप्पासमोर लेझीम खेळायचो. ते दिवस मी कधीच विसरू शकत नाही. गेल्या १० वर्षात कामाच्या गडबडीमुळे मी जाऊ शकलो नाही. पण यंदा मात्र मी आवर्जून सोलापुरातल्या माझ्या आजोबा गणपतीचं दर्शन घेणार आहे.

नम्रता प्रधान (छत्रीवाली मालिकेतील मधुरा) -
गणपती बाप्पा हे माझं सर्वात आवडतं दैवत. बाप्पाच्या सजावटीपासून ते अगदी नैवेद्यापर्यंत सगळ्यात माझा सहभाग असतो. गेल्या वर्षी मी बाप्पाच्या आवडीच्या जास्वंदीच्या फुलाची सजावट केली होती. यंदा शूटिंगमुळे मला सजावटीमध्ये सहभाग घेता आला नाही, मात्र सजावटीत छत्रीचा वापर जरुर करा असं मी माझ्या फॅमिलीला आवर्जून सांगितलंय. नुपूर परुळेकर - (नकळत सारे घडले मालिकेतील नेहा) -
गणपती बाप्पा सगळ्यांचाच लाडका देव आहे तसंच माझाही आहे. काहीही झालं तरी बाप्पा आपलं रक्षण करतो ही गोष्ट माझ्या मनावर लहानपणापासूनच कोरली गेलीय. मला आठवतंय लहानपणी मला अंधाराची खूप भीती वाटायची. खेळून झाल्यावर घरी परत येताना किंवा घरात एकटं असताना मला सतत माझ्यासोबत कुणीतरी असल्याचा भास व्हायचा. मनातली ही भीती मी जेव्हा माझ्या आईला सांगितली तेव्हा तिने मला अजिबात न घाबरण्याचा सल्ला दिला. तुझ्यासोबत असणारी ती व्यक्ती म्हणजे गणूबाप्पाच असल्याचं सांगत तिने माझ्या मनातली भीती घालवली. अजिंक्य राऊत (विठुमाऊली - विठ्ठल) -
आमच्या गणपती बाप्पाची आरास खूपच खास असते. बाप्पाच्या सजावटीसाठी आम्ही लाडूंचा वापर करतो. त्यामुळे दरवर्षी मला खूप सारे लाडू खायला मिळतात. यंदा बऱ्याच गणेश मंडळांनी आणि घरगुती गणपतीही विठुमाऊलीच्या रूपात साकारलेला पाहायला मिळत आहेत.

Trending Now