उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला

पालघर आणि भंडारा-गोंदिया या दोन मतदारसंघात लोकसभा पोटनिवडणुकांसाठी आज 28 मे रोजी मतदान होणार आहे.

Sachin Salve
पालघर, 28 मे : पालघर आणि भंडारा-गोंदिया या दोन मतदारसंघात लोकसभा पोटनिवडणुकांसाठी आज 28 मे रोजी मतदान होईल. सकाळी 7 वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे.पालघरच्या पोटनिवडणुकांकडे फक्त राज्याचंच नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. कारण भाजप आणि शिवसेनेनं ही निवडणूक प्रतिष्ठेची केलीय. आणि या निवडणुकीच्या निमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात वाग्युद्धही चांगलच रंगलंय. पालघरचा गड काबीज करण्यासाठी दोन्ही पक्षांनी आपली शक्ती पणाला लावलीय. उद्धव ठाकरेंनी स्वतः प्रचारसभा घेतल्या.तर भाजपच्या वतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, स्मृती इराणी यांना देखील प्रचाराच्या रिंगणात उतरले. एवढंच नाहीतर अखेरच्या दिवशी सेनेनं मुख्यमंत्र्यांची आॅडिओ क्लिप बाहेर काढून एकच खळबळ उडवून दिली. मुख्यमंत्र्यांनीही संपूर्ण क्लिप प्रसिद्ध करून सेनेवर पलटवार केला. एकत्र सत्तेत राहणारे दोन्ही पक्ष पालघर जिंकणार का ?, याकडे महाराष्ट्राचे लक्ष्य लागले आहे.

भंडारा आणि गोंदिया पोटनिवडणुकीकडे देखील विदर्भाचं लक्ष लागलंय. कारण भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या नाना पटोले यांना ऐनवेळी उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे राष्ट्रवादी आणि भाजप अशी लढत गोंदिया-भंडारामध्ये होणार आहे.  या निवडणुकीत एकूण 18 उमेदवार असून खरी लढत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर कुकडे आणि आणि भाजपचे हेमंत पटले यांच्या आहे. आज सकाळी सात वाजे पासून मतदानाला सुरुवात झाली आहे आणि सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान सुरू राहणार आहे.या निवडणुकीत पहिल्यांदाच व्हीव्हीपीटीचा वापर होणार आहे. गोंदिया जिल्ह्यात अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नक्षलग्रस्त भागात फक्त 3 वाजेपर्यंतच मतदान होणार आहे. या निवडणुकीत भंडारा गोंदिया मिळून 17 लाख 59 हजार 977 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील, या मध्ये 8,82,175 हे पुरुष मतदार आहेत तर 8,75,679 स्त्री मतदार आहेत.मतदानासाठी 2149 मतदान केंद्र स्थापन केले आहे. यावर 11 हजार 700 कर्मचारी नियुक्त केले आहे. मतदान सुरळीत चालावा म्हणून 1909 पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली गेली आहे आणि 5 तुकड्या अतिरिक्त पोलीस बलाच्या नेमण्यात आल्या आहेत.

Trending Now