टिळक - रंगारी वादावर पुणे महापौरांची सारवासारव

गणेशोत्सवाच्या लोगोतून लोकमान्य टिळक फोटो गायब करण्यावर चौफेर टीका होताच महापौर मुक्ता टिळक यांनी आता सारवासारव सुरू केलीय. 125 व्या पुणे गणेश उत्सवाच्या बोधचिन्हात टिळकांचा फोटो टाकण्याचं कोणतंही नियोजन नव्हतंच. असा दावा महापौरांनी केलाय.

Chandrakant Funde | News18 Lokmat
पुणे, प्रतिनिधी, 12ऑगस्ट : गणेशोत्सवाच्या लोगोतून लोकमान्य टिळक फोटो गायब करण्यावर चौफेर टीका होताच महापौर मुक्ता टिळक यांनी आता सारवासारव सुरू केलीय. 125 व्या पुणे गणेश उत्सवाच्या बोधचिन्हात टिळकांचा फोटो टाकण्याचं कोणतंही नियोजन नव्हतंच. असा दावा महापौरांनी केलाय. या गणेशोत्सवादरम्यान, जाहिराती, आणि फ्लेक्सवर मात्र, शिवाजी महाराज आणि लोकमान्यांचा फोटो झळकणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. सार्वजनिक गणेशोत्सवाचं यंदाचं शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. पण महोत्सवाच्या लोगोमधून लोकमान्य टिळकांचा फोटो वगळणं, ही लोकमान्य टिळकांचीच अवहेलना असल्याची टीका भाऊ रंगारी ट्रस्टनं केलीय. सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्याचं श्रेय भाऊ रंगारी यांना मिळू नये, यासाठीच महापौर मुक्ता टिळक अशा पद्धतीचं खालच्या पातळीवरचं राजकारण खेळत असल्याचा आरोपही ट्रस्टनं केलाय.पुण्यात सध्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक भाऊ रंगारी की लोकमान्य टिळक यावरून मोठा वाद सुरु आहे. शिवाय यंदा सार्वजनिक गणेशोत्सवाचं हे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. परंतु, सार्वजनिक गणेशोत्सवाचं हे १२५ वं नाही, तर १२६ वं वर्ष आहे, असं म्हणत भाऊ रंगारी ट्रस्टनं कोर्टात धाव घेतलीय. या वादात भर नको म्हणून महापालिकेच्या महोत्सवासाठी बनवलेल्या लोगोमधून टिळकांचा फोटो वगळ्याचा निर्णय महापौरांनी घेतलाय. पण त्यांच्या या कृतीने हा वाद कमी न होता उलट वाढलेला दिसतोय. दरम्यान, हा वाद अकारण उकरुन काढला जात असल्याची खंत टिळक घराण्याचे वारसदार डॉ. दीपक टिळक यांनी व्यक्त केलीय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज शनिवार वाड्यावर 125 व्या गणेशोत्सवानिमित्त या वादग्रस्त लोगोचं आणि थीम साँगचं उदघाटन होणार आहे. म्हणून या रंगारी की टिळक वादावर मुख्यमंत्री नेमकं काय बोलतात ते पाहावं लागेल.

Trending Now