थायलंडच्या मुलांच्या सुटकेचं हे आहे महाराष्ट्र कनेक्शन

गुहेतून मुलांना बाहेर काढण्यासाठी सर्वात महत्वाचं आणि आव्हानात्मक काम होतं ते गुहेतून पाणी बाहेर काढण्याचं. किर्लोस्करच्या पंपांनी ते काम पूर्ण केलं.

पुणे,ता.10 जुलै : थायलंडमध्ये गुहेमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना सोडवण्यासाठी जगभरातून मदतीचा हात पुढे आला. यात भारतानेही मदतीचा हात पुढे केला होता. गुहेतून पाणी बाहेर काढण्यासाठी किर्लोस्कर कंपनीने मदत केली आणि त्यामुळे सर्व मुलांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं. गुहेतून मुलांच्या सुटकेसाठी भारत तांत्रिक आणि तज्ञ मनुष्यबळाची मदत करण्यास तयार आहे असं काही दिवसांपूर्वीच परराष्ट्र मंत्रालयाने थायलंड सरकारला कळवलं होतं. त्यानंतर किर्लोस्कर कपंनीची मदत घेण्याचा निर्णय थायलंड सरकारने घेतला.गुहेतून मुलांना बाहेर काढण्यासाठी सर्वात महत्वाचं आणि आव्हानात्मक काम होतं ते गुहेतून पाणी बाहेर काढण्याचं. या क्षेत्रात किर्लोस्कर कंपनी गेल्या अनेक दिवसांपासून जगभर काम करते आहे. त्यामुळे कंपनीचे तज्ञ इंजिनियर आणि डिझाईन हेड प्रसाद कुलकर्णी हे आपल्या टीम सोबत थायलंडला गेले. कुलकर्णी हे पाण्याचा उपसा करणाऱ्या पंपांचे तज्ज्ञ आहेत. थायलंडमध्ये पोहोचल्यानंतर प्रसाद आणि त्यांच्या टीमने किर्लोस्कर पंपांच्या साह्याने गुहेतून पाण्याचा उपसा सुरू केला. त्यासाठी त्यांनी खास टेक्निकचा वापर करून नेहमीपेक्षा जास्त पाणी बाहेर काढलं त्यामुळे गुहेतल्या पाण्याची पातळी कमी झाली आणि बचाव पथकाला गुहेत काम करणं सोपं झालं.आज झाली सर्वांची सुटका

थायलंडमधल्या टॅम लुंग गुहेत अडकलेल्या सर्व मुलांना आज मदत पथकाने सुरक्षित बाहेर काढलं. आज सकाळी 10 वाजता सुरू झालेली मोहिम सायंकाळी संपली आणि गेली 16 दिवस जीवाचं रान करणाऱ्या एक हजार जणांच्या मदत पथकाने सुटकेचा नि:श्वास सोडला. 16 पाणबुड्यांच्या टिमने आज दुपारी तीन मुलांना बाहेर काढलं आणि नंतर एक मुलगा आणि कोच सुखरूप बाहेर आला. ऑक्सिजनची कमतरता, अरूंद मार्ग आणि वाढत जाणारं पाणी अशा सर्व प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मदत पथकानं ही मोहिम फत्ते केलीय. 

Trending Now