एमआयएमच्या नगरसेवकाला मारहाण प्रकरणी भाजपचे नेते पोलिसांच्या ताब्यात

औरंगाबादचे एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन मारहाण प्रकरणी आता भाजपच्या नगरसेवकांची धरपकड सुरू झाली आहे.

औरंगाबाद, 20 ऑगस्ट : औरंगाबादचे एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन मारहाण प्रकरणी आता भाजपच्या नगरसेवकांची धरपकड सुरू झाली आहे. भाजपचे उपमहापौर विजय औताडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्याचबरोबर राज वानखेडे आणि प्रमोद राठोड यांनाही अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, 17 ऑगस्टला अटल बिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली प्रस्तावाला एमआयएमच्या सय्यद मतीनने विरोध केला होता. त्यानंतर भाजपच्या नगरसेवकांनी मतीनला चपलेनं चांगलाच चोप दिला होता.या प्रकरणात धार्मिक भावना दुखावणे, जातीय तेढ निर्माण करणे आणि दंगा भडकवण्याच्या आरोपाखाली सय्यद मतीनला अटक करण्यात आली आहे. त्याचबरोबर भाजप नगरसेवक प्रमोद राठोड, उपमहापौर विजय औताडे, राज वानखेडे यांच्याविरोधातही मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.समांतर जलवाहिनी प्रकल्पाच्या प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी 17 ऑगस्टला सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन झाल्यामुळे त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा विषय महापौरांनी घेतला.

यानंतर एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन यांनी श्रद्धांजली अर्पण करण्याच्या ठरावाचा निषेध केला. त्यामुळे भाजपचे सदस्य संतप्त झाले. प्रमोद राठोड, राज वानखेडे, माधुरी अदवंत, रामेश्वर भादवे यांनी मतीन यांच्यावर हल्ला चढवला. त्यांना अक्षरश: खाली पाडून लाथा- बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. माधुरी अदंवत यांनी तर मतीन यांना चपलेने मारले.दरम्यान, या प्रकरणावरून औरंगाबादेत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. भाजपचे सर्व कार्यकर्ते सिटी चौक पोलीस ठाण्यात गोळा झाले होते. मतीन यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये भाजपचे नेते जमले होते. अखेर पोलिसांनी मतीन यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत आणि आता त्यांची पोलिसांकडून धरपकड सुरू आहे. VIDEO: वाजपेयींच्या श्रद्धांजली सभेला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला चपलेने मारले

   

Trending Now