पुन्हा घुमणार 'हिंदी-चीनी भाई-भाई'चा नारा?

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपींग यांच्यातल्या औपचारिक शिखर परिषदेला सुरवात झालीय. चीनच्या वुहान शहरात दोन्ही देशांच्या दोन दिवस चर्चेच्या सहा फेऱ्या होणार आहेत.

Ajay Kautikwar
बीजिंग,ता.27 एप्रिल: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपींग यांच्यातल्या औपचारिक शिखर परिषदेला सुरवात झालीय. चीनच्या वुहान शहरात दोन्ही देशांच्या दोन दिवस चर्चेच्या सहा फेऱ्या होणार आहेत.शी जिनपींग यांनी पारंपरिक प्रथेला फाटा देत राजधानी बीजिंग बाहेर अशी शिखर परिषद आयोजित केल्यानं त्याला महत्व प्राप्त झालं आहे.पंतप्रधानांचं औपचारिक स्वागत झाल्यानंतर मोदी आणि जिनपींग यांनी तिथल्या संग्रहालयाची पाहणी करत चर्चा केली. नंतर ईस्ट लेक गेस्ट हाऊसमध्ये दोनही नेत्यांच्या चर्चेच्या पहिल्या फेरीला सुरवात झाली.यावेळी त्यांच्यासोबत फक्त अनुवादकच उपस्थित होते. दोन दिवसांच्या या शिखर परिषदला कुठलाही नेमका अजेंडा नसल्यानं या चर्चेत महत्वाच्या आणि वादाच्या सर्वच प्रश्नांवर मोकळी चर्चा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

डोकलाम नंतर दोन्ही देशांच्या संबंधात तणाव निर्माण झाला होता. गेल्या काही दशकांमध्ये भारतात मोठा बदल झाला.लष्करी आणि व्यापारी दृष्टीनं भारताला कमी लेखनं शक्य नाही याची चीनला जाणीव आहे. त्यातच डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनकडून होणारी आयात कमी करण्याचा निर्णय घेतल्यानं त्याचा फटका चीनला बसू शकतो. अशा पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमधली ही चर्चा अतिशय महत्वाची समजली जाते.या आधी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी आणि अध्यक्ष तंग श्योपींग यांची 1988 मध्ये अशीच बैठक झाली होती. त्यानंतर दोन्ही देशांदरम्यानचा तणावही कमी झाला होता. 1965 च्या युद्धानंतर निर्माण झालेली कटुता कमी करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. आता 30 वर्षानंतर पुन्हा तशीच भेट होत आहे.या शिखर परिषदेमुळं दोन्ही देशांमधला तणाव कमी होत पुन्हा 'हिंदी-चीनी भाई-भाई'चा नारा घुमणार का असा प्रश्न विचारला जातोय. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट करून पंतप्रधानांनी डोकलामचा मुद्दा उपस्थित करावं असा सल्ला दिलाय. दोन्ही नेत्यांची बैठक म्हणजे नो अजेंडा मिटिंग आहे असंही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Trending Now