एमआयएमच्या नगरसेवकाला मारहाण प्रकरणी भाजपच्या नगरसेवकांना अटक

17 ऑगस्टला औरंगाबाद महापालिकेत सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते

औरंगाबाद, 20 आॅगस्ट :  भारताचे माजी दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजयेपी यांना श्रद्धांजली वाहण्यावरून औरंगाबाद महापालिका सभागृहात झालेल्या मारहाण प्रकरणी औरंगाबाद पोलिसांनी भाजपच्या ५ नगरसेवकांना अटक केली आहे. मारहाण झालेला एमआयएमचा नगरसेवक सय्यद मतीन यानं याबाबत तक्रार केली होती. सभागृहात अमानुष मारहाण झाल्याच त्यानं तक्रारीत नमूद केलं होतं, याच तक्रारीवरून भाजप गटनेते प्रमोद राठोड, उपमहापौर विजय औताडे, नगरसेवक, राजगौरव वानखेडे, माधुरी अदवंत, आणि रामेश्वर भादवे यांना अटक कऱण्यात आली आहे.या सगळ्यांना सिटी चौक पोलीस ठाण्यात ठेवण्यात आलंय. या नगरसेवकांविरोधात शनिवारी याबाबत गुन्हा दाखल झाला होता, तर त्याच दिवशी एमआयएम नगरसेवक सय्यद मतिनलाही अटक झाली होती. सध्या मतीन न्यायालयीन कोठडीत आहे.17 ऑगस्टला औरंगाबाद महापालिकेत सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते.  समांतर जलवाहिनी प्रकल्पाच्या प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी  माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन झाल्यामुळे त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा प्रस्ताव महापौरांनी मांडला.

यानंतर एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन यांनी श्रद्धांजली अर्पण करण्याच्या ठरावाचा निषेध केला. त्यामुळे भाजपचे सदस्य संतप्त झाले. प्रमोद राठोड, राज वानखेडे, माधुरी अदवंत, रामेश्वर भादवे यांनी मतीन यांच्यावर हल्ला चढवला. त्यांना अक्षरश: खाली पाडून लाथा- बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. माधुरी अदंवत यांनी तर मतीन यांना चपलेने मारले.दरम्यान, या प्रकरणावरून औरंगाबादेत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. भाजपचे सर्व कार्यकर्ते सिटी चौक पोलीस ठाण्यात गोळा झाले होते. मतीन यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये भाजपचे नेते जमले होते. अखेर पोलिसांनी मतीन यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत आणि आता त्यांची पोलिसांकडून धरपकड सुरू आहे.VIDEO: वाजपेयींच्या श्रद्धांजली सभेला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला चपलेने मारले

Trending Now