कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी मिलिंद एकबोटेंना अटक होण्याची शक्यता

कोरेगाव भीमा दंगलीप्रकरणी समस्त हिंदु आघाचीचे प्रमुख मिलिंद एकबोटे यांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जातेय. पुणे ग्रामीण पोलिसांकडून त्यांचा कसून शोध सुरू असल्याचंही कळतंय. 1जानेवारी रोजी कोरेगाव भीमा इथं शौर्य दिनाच्या दिवशी आंबेडकरी अनुयायी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर जमा झाले होते.

Chandrakant Funde
11 जानेवारी, पुणे : कोरेगाव भीमा दंगलीप्रकरणी समस्त हिंदु आघाचीचे प्रमुख मिलिंद एकबोटे यांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जातेय. पुणे ग्रामीण पोलिसांकडून त्यांचा कसून शोध सुरू असल्याचंही कळतंय. 1जानेवारी रोजी कोरेगाव भीमा इथं शौर्य दिनाच्या दिवशी आंबेडकरी अनुयायी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर जमा झाले होते. याच अनुयायांवर सणसवाडीजवळ एका गटाकडून हल्ला करण्यात आला होता. त्यांच्या गाड्यांची मोठ्या प्रमाणावर तोडफोड झाली होती. तसंच या हिंसक जमावाने काहींची घरं देखील पेटवून दिली होती.कोरेगाव भीमा परिसरात आंबेडकरी अनुयायांवर हल्ला करणाऱ्या या हिंसक जमावल्याचा चिथावणी दिल्याचा आरोप मिलिंद एकबोटे यांच्यावर ठेवण्यात आलाय. संभाजी भिडे यांच्यावरही याच गुन्ह्यात अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल झालाय. त्यामुळे या दोघांनाही तात्काळ अटक करण्याची मागणी प्रकाश आंबेडकर यांच्याकडून होतेय. या पार्श्वभूमीवरच पुणे ग्रामीण पोलिसांकडून मिलिंद एकबोटे यांचा शोध सुरू झाल्याची सूत्रांची माहिती आहे.कोण आहेत मिलिंद एकबोटे ?

मिलिंद एकबोटे हे पुण्यातील हिंदुत्ववाद्यांसाठी युवकांची आक्रमक संघटना चालवतात. समस्त हिंदु आघाडी असं त्यांच्या संघटनेचं नाव आहे. दादोजी कोंडदेव पुतळा हटवतानाही त्यांनी तीव्र विरोध केला होता. तसंच प्रतापगडावरील अफजल खानाची समाधी हटवण्यासाठीही त्यांनी आंदोलन केलं होतं. पुणे महापालिकेच्या राजकारणातही ते यापूर्वी सक्रिय होते. आता त्यांची वहिनी मनपाचे इलेक्शन लढवते. पुण्यात हिंदुत्ववादी विरूद्ध पुरोगामी असा वाद उभारल्यास मिलिंद एकबोटे हे नेहमीच हिंदुत्ववाद्यांच्या बाजुने मैदानात उतरताना दिसतात. गेल्या महिन्यात शनिवार वाड्यावर डाव्या संघटनांनी भरवलेल्या एल्गार परिषदेला मिलिंद एकबोटेंनी कडाडून विरोध केला होता. याच वादातून वढू ब्रुद्रूकमध्ये गोविंद महार समाधीच्या पोस्टरचा वाद उकरून दंगल घडवली गेल्याचा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकरांनी मिलिंद एकबोटेंवर केलाय.

Trending Now