फी न भरल्यामुळे विद्यार्थिनीला ठेवलं परीक्षेपासून वंचित!

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहरातल्या 'सेंट जोसेफ कॉन्वेंट हायस्कूल'मध्ये इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीला फी न भरल्यानं परिक्षेला बसू न दिल्याचा प्रकार घडलाय.

सोलापूर, 10 सप्टेंबर : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहरातल्या 'सेंट जोसेफ कॉन्वेंट हायस्कूल'मध्ये इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला फी न भरल्यानं परिक्षेला बसू न दिल्याचा प्रकार घडलाय. पालकांनी याची तक्रार बार्शीच्या गट शिक्षणाधिकाऱ्यांकडे केल्यानंतर गट शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळेच्या मुख्याध्यापकांना जाब विचारत कारवाईचे आदेश दिले आहेत.शिक्षणाचा बाजार मांडल्याचे उदाहरण पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे. बार्शीतल्या 'सेंट जोसेफ कॉन्वेंट हायस्कूल'मध्ये आज इयत्ता पाचवीतल्या विद्यार्थ्यांची परिक्षा होती. मात्र, फी न भरल्याने श्वेता देशपांडे नामक विद्यार्थिनीला परीक्षेला बसण्यास मज्जाव करण्यात आला. यानंतर विद्यार्थिनीच्या पालकांनी मुख्यध्यापकाकडे धाव घेतली आणि मुलीला परीक्षेला बसू देण्याची विनंती केली. मात्र, त्याचा काहीएक उपयोग झाला नाही. शाळेच्या मुख्याध्यापकांनी त्यांना आल्या पावली माघारी पाठवले. त्यानंतर त्यांनी बार्शीचे गट शिक्षणाधिकारी विष्णु कांबळे यांच्याकडे धाव घेतली आणि आपली तक्रार मांडली. पालकांचे म्हणणे एकून घेतल्यानंतर गट शिक्षाणाधिकाऱ्यांनी शाळेच्या मुख्याध्यापकांना जाब विचारत कारवाईचे आदेश दिले आहेत.दरम्यान, परिक्षेला बसू न दिल्यामुळे माझ्या मुलीचे मानसिक खच्चीकरण झाले असल्याचे मुलीची आई स्वाती देशपांडे यांनी म्हटले आहे. तर त्यास शाळा प्रशासन आणि मुख्याध्यापक जबाबदार असून, त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी पालकांनी केलीय. याबाबत शाळेच्या मुख्याध्यापकांना विचारणा केली असता, त्यांनी बोलण्यास नकार दिला.

VIDEO : ...आणि 'त्यांनी' रस्त्यावरील खड्ड्यात केलं बाळाचं बारसं!

Trending Now