'तो' व्हिडिओ अर्धवट,तरीसुद्धा दिलगिरी व्यक्त करतो-राम कदम

'माझ्या घाटकोपरच्या दहीहंडीत अर्धवट व्हिडिओ दाखवला जातोय'

पुणे, 05 सप्टेंबर : 'मुली पळवून नेण्यास मदत करणार, यासाठी माझा फोन नंबर घ्या' असं वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजपचे आमदार राम कदम अवघ्या महाराष्ट्राच्या रोषाला सामोरं जात आहे. राज्यभरात त्यांच्या या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला जात आहे. पण अजूनही राम कदम यांनी माफी मागण्यास नकार दिलाय. त्यांचा नवा व्हिडिओ समोर आलाय. त्यात त्यांनी माझ्या विधानाचा विपर्यास केला गेलाय जर भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो असं राम कदम म्हणाले. पण त्यांनी माफी मागण्याचं टाळलंय.घाटकोपर येथील भाजपचे आमदार राम कदम यांनी सोमवारी दहीहंडी उत्सवाचं आयोजन केलं होतं. या उत्सवामध्ये अगदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हजेरी लावली. मात्र याच उत्सवामध्ये गोविंदांशी संवाद साधताना राम कदम यांनी महिलांसंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केले होतं.

'मुलीची लग्नाला परवाणगी नसेल तर तिला पळवून आणू' असं राम कदम म्हणाले होते. एवढंच नाहीतर त्यांनी तरुणांना आपला मोबाईल नंबरही दिला होता. त्यांच्या वक्तव्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि मनसेनं कडाडून निषेध केलाय. राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलनं सुरू आहे. मंगळवारी रात्री राम कदम यांनी टि्वटवर पहिल्यांदा दिलगिरी व्यक्त केली होती. कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतु नव्हता, दुखावल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो असं, ट्विट राम कदम यांनी केलंय.आता राम कदम यांचा आणखी एक व्हिडिओसमोर आलाय. राम कदम म्हणतात, "माझ्या घाटकोपरच्या दहीहंडीत अर्धवट व्हिडिओ दाखवला जातोय. तरी सुद्धा त्याचं विवेचन न करता. महाराष्ट्रातील तमाम माता भगिणी यांचा सन्मान माझ्यासाठी लाखमोलाचा आहे. सर्वोच्च स्थानी आहे. मी अत्यंत नम्रपणे दिलगिरी व्यक्त करतो."विशेष म्हणजे राम कदम यांच्याविरोधात राज्यभरात सर्वपक्षीयांकडून आंदोलन सुरू आहे. पण त्याबद्दल भाजपने अजूनही आपली भूमिका मांडली नाही. VIDEO : फक्त हात लावूनच दाखवा, पुण्याच्या तरूणीचं राम कदम यांना खुलं आव्हान

Trending Now