बापटांच्या 'सरकार भविष्यवाणी' वक्तव्यावरून काकडेंची कुरघोडी !

खा. संजय काकडे म्हणाले, '' चाळीस वर्षे राजकारणात असलेल्या आणि कॅबिनेट मंत्री असलेल्या नेत्याने असे विधान करणे लाजीरवाणे. त्यांच्या या विधानामुळे भाजप कार्यकर्त्याचं मनोबल खच्ची झालंय. त्यामुळे बापट यांच्यावर नेमकी काय कारवाई करायची हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. मुख्यमंत्रीही योग्य तोच निर्णय घेतील.''

Chandrakant Funde
10 जानेवारी, पुणे : पुणे भाजपमधला बापट-काकडे हा वाद खरंतर पुणेकरांसाठी अजिबात नवीन नाही, यावेळीही विषय देखील राजकीय भविष्यवाणीचाच आहे. फरक फक्त इतकाच की, यावेळी बापट आणि काकडेंनी आपआपल्या भूमिका बदलल्यात, गुजरात इलेक्शनच्या वेळी बापटांनी काकडेंना टार्गेट केलं होतं तर यावेळी काकडेंनी बापटांना कोंडीत पकडलंय. निमित्त अर्थातच बापटांच्या 'त्या' सरकार भविष्यवाणी विधानाचं आहे.''वर्षभरानंतर सरकार बदलणार आहे, '' या गिरीष बापट यांच्या विधानामुळे भाजप कार्यकर्त्यांचं मानसिक खच्चीकरण झाल्याचा आरोप संजय काकडेंनी केलाय. एवढंच नाहीतर गुजरात निवडणुकीत भाजप हरणार असल्याची भविष्यवाणी करणाऱ्या खासदार संजय काकडेंना मात्र, पुढच्या निवडणुकीतही भाजपच विजयी होणार असल्याचा साक्षात्कार झालाय. लोकसभेला भाजप शिवसेनेबरोबर युती करणार असून 2019लाही 2014चीच पुनरावृत्ती होईल, असा दावा संजय काकडे करताहेत. विधानसभेतही भाजप 160च्या पुढे जाईल, अशी राजकीय भविष्यवाणीही काकडेंनी आत्ताच करून टाकलीय.गंमत म्हणजे याच काकडेंनी गुजरातच्या निवडणुकीत भाजप पराभूत होणार असल्याचं भाकित वर्तवलं होतं तेही सर्वेक्षण करून !, पण झालं उलटंच, गुजरातमध्ये भाजप सत्तेवर आलं आणि काकडेंची भलतीच पंचाईत झाली. याच विधानावरून त्यांना पक्षनेतृत्वाकडे खुलासाही करावा लागला होता. बापटांनीही त्यावेळी कारवाईची मागणी करून काकडेंवर शरसंधान साधलं होतं. यावेळी मात्र, काकडेंनी बापटांवर कारवाईची मागणी करून त्याची परतफेड केल्याचं बघायला मिळतंय.

संजय काकडे म्हणतात, '' चाळीस वर्षे राजकारणात असलेल्या आणि कॅबिनेट मंत्री असलेल्या नेत्याने असे विधान करणे लाजीरवाणे. त्यांच्या या विधानामुळे भाजप कार्यकर्त्याचं मनोबल खच्ची झालंय. त्यामुळे बापट यांच्यावर नेमकी काय कारवाई करायची हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. मुख्यमंत्रीही योग्य तोच निर्णय घेतील.''दरम्यान, राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मात्र, गिरीष बापटांची बाजू सावरून धरण्याचा प्रयत्न करत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय तर मुख्यमंत्री गटाचे संजय काकडे या वादाला आणखी हवा देण्याचा प्रयत्न करताना दिसताहेत. गिरीष बापट आणि मुनगंटीवार हे गडकरी गटाचे समर्थक मानले जातात. पुण्यातील बापट-काकडे वादाला ही देखील आणखी एक भाजपांतर्गंत गटातटाची किनार आहे.गिरीष बापट नेमकं काय म्हणाले होते ?'वर्षभरानंतर सरकार बदलणार आहे. त्यामुळे जे काही मागायचं आहे, ते आत्ताच मागून घ्या. पुढं काय होईल काय नाही याची चर्चा मी इथे करत नाही. पण पुढे काय होणार आहे हे मला माहिती आहे. कोणाचंही सरकार असो. शेतकऱ्यांना मदत करणं हे त्यांचं आद्य कर्तव्य आहे. त्यामुळे जे काही मागायचं असेल, ते आत्ताच मागून घ्या', असं गिरीश बापट म्हणाले होते.गेल्या शनिवारी अखिल महाराष्ट्र डाळिंब उत्पादक संशोधन संघाचे राष्ट्रीय अधिवेशन आणि राष्ट्रीय डाळिंब परिषद पुण्यात पार पडली. त्यात बोलण्याच्या ओघात बापटांनी राज्य सरकार बद्दल हे वक्तव्य केलं होतं.सुप्रिया सुळे यांच्याकडूनही बापटांचे अभिनंदन !गिरीष बापटाचं हे सरकारच्या भविष्यवाणीचं विधान विरोधकांनी चांगलंच उचलून धरलंय. पृथ्वीराज चव्हाण आणि सुप्रिया सुळे यांनी या विधानाबद्दल बापटाचं फक्त स्वागतच नाहीतर जाहीरपणे अभिनंदनही केलंय. गिरीष बापट खरं तेच बोलल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय.सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, "गिरीश बापटांच्या वक्तव्याचं मी मनापासून स्वागत करते. वास्तवाची जाणीव भाजपमध्ये कोणत्या नेत्यामध्ये असेल, तर ती माननीय, आदरणीय बापटसाहेबांकडे आहे. त्यामुळे त्यांनी वास्तव लक्षात घेऊन ते बोललेले आहेत. त्यामुळे त्यांचं मी मनापासून स्वागत करते." असं त्या म्हणाल्या. ''खरंतर फडणवीस सरकारच्या कामाबाबत शिवसेना आणि त्यांचे मंत्रीही जाहीरपणे टीका करतच होते. पण गिरीष बापटांच्या रुपाने प्रथमच एका भाजप मंत्र्यानेही बोलण्च्या ओघात का होईना पण त्यांच्याच सरकारला वास्तवाची जाणीव करून दिल्याने फडणवीस यांच्यासाठीही ही नक्कीच धोक्याची घंटा मानली जातेय.

Trending Now