विहीर, बिबट्या आणि पिंजरा...पाहा रेस्क्यू ऑपरेशनचा थरार

Sachin Salve

Your browser doesn't support HTML5 video.

रायचंद शिंदे, आयबीएन लोकमत, जुन्नर

26 मे : आंबेगाव आणि जुन्नर परिसरात विहिरीत पडलेला बिबट्या वनविभागाकडून जेरबंद केल्याच्या बातम्या आपण नेहमीच पाहत असतो. पण एक बिबट्या जेव्हा खोल विहिरीत पडतो...आणि त्याला कसं बाहेर काढलं जातं याबद्दलचा हा स्पेशल रिपोर्ट...

आजोबा या सिनेमात सिनेमात दाखवली जाणारी ही बिबट्याची रेस्क्यू ऑपरेशन्स खरंतर आंबेगाव आणि जुन्नर परिसरात आता एक रुटीन पॅ्रक्टिसचा भाग बनून गेलीत. काल परवाही आंबेगाव तालुक्यातल्या काठापूर बुद्रूक गावात असंच थरारक रेस्क्यू ऑपरेशन पार पडलं...ऊस तोडणी सुरू झाल्याने नव्या आसर्‍याच्या शोधात निघालेला हा बिबट्या खरंतर गफलतीने या विहिरीत येऊन पडलाय.

बिबट्या विहिरीत पडल्याची वार्ता कळतात अख्खं गाव गोळा झालं. दरम्यानच्याच काळात वनविभागालाही पाचारण करण्यात आलं. माणिकडोह बिबट्या निवारण केंद्राचं रेस्क्यू पथकही घटनास्थळी दाखल झालं. पण तोपर्यंत गावकर्‍यांना कुठं दम निघतोय. त्यांनी बिबट्या पाण्यात बुडू नये. यासाठी दोरी बांधलेली खाट विहिरीत सोडली देखील.

इथून पुढे खर्‍याअर्थाने सुरु झाला रेस्क्यू ऑपरेशन थरार..बिचारा बिबट्या खरंतर पाण्यामुळे पुरता गारठून गेला होता. पण तरीही अधूनमधून एखादी डरकारी मारून बघ्यांवर तो जरब बसवत होताच...गावकर्‍यांनी सोडलेल्या खाटेचा आधार मिळताच बिबट्या त्यावर टुणकन् उडी मारून बसला देखील...पण खाटल्याच्या दोरीला दातात पकडून वर चढण्याचा त्याचा हा केविलवाणा प्रयत्न खरंच पाहण्यासारखा होता.

दरम्यानच्या काळात वनविभागाची तयारीही युद्धपातळीवर सुरू होती. भुलीचं इजेंक्शनही सज्ज करण्यात आलं होतं. पण विहिरीत पडलेल्या बिबट्याला भुलीचं इजेक्शन देणं तसं धोकादायक होतं. कारण त्यात बिबट्याचा जीव देखील जाऊ शकतो. म्हणूनच बिबट्या निवारण केंद्राचे प्रमुख डॉ.अजय देशमुख यांनी थेट पिंजराच विहिरीत सोडून बिबट्याची सुटका करण्याचा पर्याय निवडला...

जेसीबीच्या साहाय्याने पिंजरा विहिरीत सोडताच बिबट्या स्वतःहूनच पिंजर्‍यात जेरबंद झाला.आणि सगळ्याचाच जीव भांड्यात पडला.खरंतर या रेस्क्यू ऑपरेशन मध्ये मोठी जोखीम होती. पण गावकर्‍याचं सहकार्य आणि वनविभागाचा सतर्कपणा...यामुळे बिबट्याला कोणतीही दुखापत न होता तो जेरबंद झाला.

जुन्नर आणि आंबेगाव परिसरात अशाच पद्धतीने रेस्क्यू ऑपरेशन राबवून गेल्या महिन्याभरात 4 बिबटे पकडण्यात आलेत.माणिकडोहच्या बिबट्या निवारण केंद्रात या बिबट्यांना ठेवलं जातं. पण तिथही बिबट्यांना ठेवायला पिंजरेच शिल्लक नाहीयेत. म्हणूनच पुन्हा बिबट्या आढळून आला तर त्याला कुठे ठेवायचं हा प्रश्न निवारण केंद्राला सतावतो आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

Trending Now