कोर्टाच्या आवारात शेतकर्‍याची गळफास घेऊन आत्महत्या

Sachin Salve

नांदेड (12 मार्च ): शेत जमिनीच्या खटल्यात न्याय मिळायला होत असलेला उशीर, सततची नापिकी, बँकेचं कर्ज, मुलींच्या लग्नाची चिंता अशा संकटांच्या गर्तेत अडकलेल्या एका 40 वर्षांच्या शेतकर्‍यानं कोर्टाच्या आवारातच गळफास घेऊन आत्महत्या केलीय. अर्धापूर तालुक्यात मंगळवारी ही घटना घडलीय.

अर्धापूर तालुक्यातील कोंढा इथले शेतकरी केशव कदम यांनी अर्धापूर कोर्टाच्या परिसरातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या वडिलांनी 2002 साली हा खटला दाखल केला होता. शेतजमिनीच्या खटल्याची मंगळवारी कोर्टात तारीख होती. त्यावेळी कोर्टाचं कामकाज सुरू होण्यापूर्वी सकाळी साडे नऊच्या सुमारास केशव कदम यांनी कोर्टाच्या आवारात आत्महत्या केली. नापिकी, कर्ज ,मुलींच्या लग्नाची चिंता, कोर्टातील प्रलंबित खटल्याचा निकाल लागत नसल्यानं कदम यांनी आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी कदम यांनी लिहीलेल्या चिठ्ठीत निकाल काहीही लागो पण लवकर लागावा अशी अपेक्षा व्यक्त केल्याचं पोलिसांनी सांगितलंय. कदम यांची 2 एकर शेती आहे. त्या शेतीवर ग्रामीण बँकेचं कर्ज होतं. पेरणीसाठी त्यांनी हात-उसणे पैसे घेतले होते. त्यांना 3 मुली आणि 1 मुलगा आहे. 2 मुलींच्या लग्नाची त्यांना चिंता होती. सकाळी हातात दोरी घेऊन ते परिसरात फिरत होते. आपण आत्महत्या करणार असं त्यानी अनेकांना सांगितलं देखील होतं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

Trending Now