भाजपची निवडणूक टीम अफझल खानाची फौज -उद्धव ठाकरे

Sachin Salve

06 ऑक्टोबर : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपची तुलना अफझल खानाच्या फौजेशी केलीये. महाराष्ट्र जिंकायला अफजल खानाची फौज आलीये, नरेंद्र मोदी हे महाराष्ट्राचे तुकडे करण्यासाठी आले आहेत. त्यांना मी भुईसपाट करणार अशी घणाघाती टीका उद्धव यांनी केली. ते तुळजापूरमध्ये बोलत होते.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूरमध्ये सभा पार पडली. जिल्ह्यातील शिवसेनेचे उमेदवार सुधीर पाटील, ओमराजे निंबाळकर, ज्ञानराज चौघुले, आणि ज्ञानेश्वर पाटील या उमेदवारांसाठी ही प्रचारसभा झाली. विशेष म्हणजे तुळजापूर मतदारसंघावरून महायुतीत वाद झाला होता, या जागेसाठी शिवसेनेने प्रतिष्ठा पणाला लागलीये. त्यामुळे उद्धव ठाकरे तुळजापुरात काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष होतं. उद्धव यांनी पुन्हा युती तोडण्यासाठी भाजपला जबाबदार धरलं. भाजपकडे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा नाही. त्यामुळे त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींना सभा घ्याव्या लागत आहे. त्याच्यासोबत केंद्रीय मंत्रिमंडळाची टीमही इथं आली. महाराष्ट्र जिंकायला आलेली ही अफजल खानाची फौज आहे अशी तुलनाच उद्धव यांनी केली. लोकसभेत मोदी पंतप्रधान व्हावेत असं स्वप्न आम्हीही पाहिलं होतं तशी मदतही आम्ही केली आणि ते स्वप्न आता पूर्ण झालंय. आता विधानसभेला महायुतीचं सरकार यावं असं स्वप्नही आम्ही पाहिलं. पण काय झालं कसं त्यांच्या मनात काय आलं आणि त्यांनी युती तोडली. आता त्यांना खुर्ची मिळाली त्यामुळे सेनेची गरज राहिली नाही. सेनेचा त्यांनी वापर केला. महाराष्ट्राचा विकास करणार असं करणार तसं करणार असं मोदी म्हणत आहे पण त्या विकासाच्या आड नरेंद्र मोदी महाराष्ट्राचे तुकडे करण्यासाठी आले आहेत. पण या भुलथापेला महाराष्ट्राची जनता भुलणार नाही. जे महाराष्ट्राला भुईसपाट करण्यासाठी आले आहे त्यांना मी भुईसपाट करेल असंही उद्धव म्हणाले. गोपीनाथ मुंडे युती जोडणारे दुवा होते असं सांगत त्यांनी मुंडेंच्या आठवणींना उजाळा दिला.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

Trending Now