शिवबंधनाचा धागा तुटला, वाकचौरे काँग्रेसमध्ये !

Sachin Salve

24 फेब्रुवारी : अखेर शिवसेनेचे शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिवबंधनाचा धागा हातावरुन उतरवून शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' केलाय. ठरल्याप्रमाणे वाकचौरे यांनी आज (सोमवारी) काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. श्रीरामपूरमध्ये काँग्रेसच्या मेळावा पार पडला.

त्यावेळी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत वाकचौरे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. गेल्या काही दिवसांपासून वाकचौरे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा होती अखेर आज या चर्चेला पूर्णविराम मिळालाय. मात्र वाकचौरे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे सेनेत संतापाचं वातावरण आहे. शिर्डीत कृषीमंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांच्या संपर्क कार्यालयासमोर संतप्त शिवसैनिकांनी वाकचौरे यांच्या पुतळ्याचं दहन केलंय.

गेल्या काही दिवसांपासून वाकचौरे काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू होती. वाकचौरे काँग्रेस नेत्यांच्या संपर्कात होते. एवढंच नाही तर वाकचौरेंनी बाळासाहेब विखे पाटील यांची भेटही घेतली होती. त्यामुळे वाकचौरे काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश करणार असा अंदाज व्यक्त केला जात होता. अखेर 18 फेब्रुवारीला वाकचौरे काँग्रेसच्या तंबूत दाखल झाले.

18 फेब्रुवारीला संध्याकाळी वाकचौरे यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, माणिकराव ठाकरे यांच्यासोबत अर्धातास चर्चा केली. आणि या चर्चेदरम्यान वाकचौरे औपचारीकरित्या काँग्रेसमध्ये दाखल झाले. पण 24 फेब्रुवारीला अहमदनगरच्या श्रीरामपूर तालुक्यात काँग्रेसचा मेळाव्यात ते अधिकृतपणे प्रवेश करतील असं ठरलं होतं. आणि ठरल्याप्रमाणे वाकचौरे आज काँग्रेसमध्ये परतले. वाकचौरे हे अगोदर शासकीय अधिकारी होती. तसंच ते शिर्डी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारीही राहिलेत. बाळासाहेब विखे पाटील गटाचे ते निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात.

2009 मध्ये शिर्डीत काँग्रेसकडून वाकचौरेंना तिकीट जवळपास मान्य झालं होतं पण ऐनवेळी आघाडीने रामदास आठवले यांना तिकीट दिल्यामुळे नाराज झालेल्या वाकचौरेंनी सेनेत प्रवेश केला आणि शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आले होते. आता बाळासाहेब विखे पाटील, बाळासाहेब थोरात यांच्या मर्जी शिवाय आपण निवडून येऊ शकत नाही. याची खात्री झाल्यामुळे वाकचौरे यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. वाकचौरे काँग्रेसमध्ये गेल्यामुळे शिवसेनेला हा दुसरा धक्का आहे. या अगोदर कल्याणचे सेनेचे खासदार आनंद परांजपे राष्ट्रवादीच्या गळाला लागले. त्यानंतर शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. आणि त्यांच्यापाठोपाठ आता परभणीचे खासदार गणेश दुधगावकर हेही राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.

Trending Now