घरगुतीसह सर्वच वीजदरात 20 टक्के कपात

Sachin Salve

20 जानेवारी : अखेर राज्यातील वीज ग्राहकांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिलाय. वीजदरांमध्ये कपात करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळात घेण्यात आलाय. या निर्णयानुसार घरगुती वापरासह सर्व प्रकारच्या वीजदरांमध्ये 20 टक्के कपात करण्यात येणार आहे.

त्यासाठी राज्य सरकार महावितरण कंपनीला 606 कोटी रुपये अनुदान देणार आहे. तर महानिर्मिती आणि महापारेषण कंपन्यांना महिन्याला 100 कोटी रुपयांचा भार सोसावा लागणार आहे. राज्य मंत्रिमंडळाचा हा प्रस्ताव एमईआरसी (MERC) कडे पाठवला जाईल. आता एमईआरसीच्या परवानगीनंतर निर्णयाची अंमलबजावणी होईल.

नव्या वीज कपातीनुसार 0 ते 100 युनिटसाठी आता 3.36 रुपये मोजावे लागणार आहे. आणि 100 ते 300 युनिटसाठी 6.05 रुपये मोजावे लागतील. आधी हे दर 0 ते 100 युनिटसाठी 4.16 तर 100 ते 300 युनिटसाठी 7.42 रु. इतके होते. दिल्लीत आम आदमी सरकारने 50 टक्के वीज दरात कपातीची घोषणा केली. दिल्लीप्रमाणे महाराष्ट्रातही वीज दरात कपात करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि खासदार संजय निरुपम यांनी केली होती.

त्यांच्या या मागणीनंतर उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. यासमितीने राज्यात 15 ते 20 टक्के वीज कपात करता येईल असं अहवाल शुक्रवारी दिला होता. मुख्यमंत्र्यांनी याबाबत सोमवारी निर्णय घेणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. अखेर अपेक्षेप्रमाणे वीज दरात कपात करण्याची घोषणा करण्यात आलीय पण राज्यसरकारच्या तिजोरीत 606 कोटींचा खड्डा पडलाय. दरम्यान, मुंबईतल्या वीजदराबाबत मंत्रीमंडळाच्या पुढच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल, असं राज्य सरकारनं स्पष्ट केलंय.

 वीजदर कपातीचा निर्णय      युनिट              आधीचे दर        नवे दर      0-100             4.16 रु.         3.36 रु. 100-300             7.42 रु.         6.05 रु.

Trending Now