राज्यात 20 टक्के वीज दर कपात, निर्णय सोमवारी ?

Sachin Salve

16 जानेवारी : दिल्लीत आम आदमी पार्टीने 50 टक्के वीज दर कपात केल्यानंतर महाराष्ट्रातही वीज कपातीसाठी राज्य सरकारनेही कंबर कसली. यासाठी सर्व प्रकारच्या वीजदरात 10 ते 20 टक्के कपात करण्याची शिफारस उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या समितीने राज्य सरकारला केली आहे.

पंधरा दिवसांपासून राणे समितीचा अहवाल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या समोर पडून आहे. पण अजूनही राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या अहवालावर चर्चा होऊन निर्णय होत नाहीये. नारायण राणे यांना श्रेय मिळू नये म्हणूनच हा निर्णय लांबणीवर टाकला जातोय अशीही चर्चा सुरू झाली आहे.

तर वीजदर कपातीबाबत सर्वानुमते निर्णय व्हावा, तसंच 'आप'चं अनुकरण आपण केलंय असं चित्र निर्माण होऊ नये यासाठी मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय सोमवारपर्यंत लांबणीवर टाकल्याचीही चर्चा आहे. दरम्यान, मुंबईतले काँग्रेसचे खासदार संजय निरूपम आणि प्रिया दत्त तसंच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून वीजदर कपातीची मागणी केलीये. तर गेल्या हिवाळी अधिवेशनात उर्जा मंत्री आणि उपमुख्यंमत्री अजित पवार यांनी महिन्याभराच्या आत वीजदर कपातीचं धोरण सरकार जाहीर करेल असं आश्वासन दिलं होतं.

Trending Now