'आप' इफेक्ट.,'राज्यातही वीज दर कमी करा'

Sachin Salve

01 जानेवारी : दिल्लीमध्ये आप सरकारनं 400 युनिटपर्यंत वीजेच्या वापरावर 50 टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा परिणाम ताबडतोब राज्यातही दिसून येतोय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि खासदार संजय निरुपम यांनी पक्षालाच घरचा अहेर दिलाय. विजेचे दर कमी केले नाही, तर आंदोलन छेडू असा इशारा निरुपम यांनी दिला आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पत्र लिहून ठाकरे आणि निरुपम यांनी मागणी केलीय.

राज्यात 500 युनिटपर्यंत वीज वापरणार्‍या ग्राहकांना सवलत देण्याची मागणी त्यांनी केली आहे. कंपन्यांऐवजी ग्राहकांना सबसिडी दिली जावी, तसंच कंपन्यांच्या वीजदराचं ऑडिट केलं जावं अशी मागणीही त्यांनी केली.

दरम्यान, वीजदर कमी करण्यासाठी राज्य सरकारनं आधीच नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करण्यात आलीये. ऊर्जामंत्री अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान विधिमंडळात यासंबंधी घोषणा केली होती. दिल्लीत आम आदमीने सरकार स्थापन केल्यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कामाचा धडाका लावलाय. दिल्लीकरांना नववर्षाची भेट देत केजरीवाल यांनी वीज दरात 50 टक्क्यांनी कपात केलीय. आपच्या या निर्णयानंतर एकीकडे दिल्लीत काँग्रेसने आक्षेप घेतलाय तर राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी पक्षाला घरचा अहेर देत वीज कपात करण्याची मागणी केली आहे.

Trending Now