सासरच्यांनी विवाहितेला खांबाला बांधून जिवंत जाळलं,आरोपी अजूनही मोकाटच

आजही महाराष्ट्रात हुंडयासाठी महिलांना जिवंत जाळल्याच्या घटना घडत असतील तर खरंच महाराष्ट्राला पुरोगामी म्हणावं का?

गणेश गायकवाड,04 आॅगस्ट : हुंड्यासाठी विवाहितेचा छळ करत तिला घरातल्या खांबाला बांधून जिवंत जाळल्याची घटना अंबरनाथ तालुक्यातल्या उसाटणे गावात घडली होती. याप्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी सुप्रीम कोर्टापर्यंत धाव घेतली. मात्र सगळीकडे जामीन फेटाळूनही पोलिसांनी आरोपींना अटक केली नसल्याचा प्रकार समोर आलाय.हुंड्यासाठी घरातील खांबाला बांधून जिवंत जाळलेल्या दीपा वायले या विवाहितेचे हे कुटुंब...दीड वर्षानंतर आजही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. अंबरनाथ तालुक्यातल्या वसार गावात राहणाऱ्या दीपाचा विवाह २०११ साली उसाटणे गावात राहणाऱ्या विश्वास पाटील याच्यासोबत झाला होता. मात्र लग्नानंतर २ वर्षांनी तिची सासू सीताबाई, दीर संजय आणि भावजई सुरेखा पाटील यांनी तिचा हुंड्यासाठी अनन्वित छळ सुरू केला. यात पती विश्वासची मूक संमती होती. त्यामुळे २४ फेब्रुवारी २०१७ रोजी दीपाला सासरच्यांनी घराच्या गच्चीत नेऊन खांबाला बांधून पेटवून दिलं, तसंच तिचा मृत्यू झाल्यानंतर तिचा मृतदेह वरून फेकून देत तिनं पेटवून घेत उडी मारली आणि आत्महत्या केली असा बनाव रचला. मात्र ज्यावेळी दीपाच्या माहेरच्यांनी तिचा मृतदेह बघितला, त्यावेळी तिच्या गळ्यात वायर गुंडाळण्यात आल्याचं समोर आलं. मयत दीपा वायले

या प्रकरणी उल्हासनगरच्या हिललाईन पोलिसांनी हुंडाबळी आणि हत्येचा गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्यानं दीपाच्या भावाने  हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात केली. अखेर  न्यायालयाच्या आदेशानंतर उल्हासनगरच्या हिललाईन पोलिसांनी ३ महिन्यांनी हत्या आणि हुंडाबळीचा गुन्हा दाखल केला. दीपाचा पती विश्वास, सासू सीताबाई, दीर संजय आणि भावजई सुरेखा पाटील यांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी धावाधाव सुरू केली. आरोपी पती विश्वास पाटीलमात्र सेशन कोर्टापासून सुप्रीम कोर्टापर्यंत सगळीकडे त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला. त्यानंतरही हे सगळे अजूनही मोकाट फिरत आहेत. या सगळ्यात पोलिसांनी मोठे आर्थिक व्यवहार करत प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचा थेट आरोप वायले कुटुंबीयांनी केलाय. पोलिसांवर वायले कुटुंबाने आरोप केल्याने या प्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक घनश्याम पलंगे यांना विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.आजही महाराष्ट्रात हुंडयासाठी महिलांना जिवंत जाळल्याच्या घटना घडत असतील तर खरंच महाराष्ट्राला पुरोगामी म्हणावं का?,असा प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही.

Trending Now