...जेव्हा अजितदादा टपरीवरची कॉफी आणि भज्यांवर ताव मारतात !

हिंगोलीत अजित पवार टपरीवर लोकांमध्ये बसून कॉफी प्यायल्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय कॉफी बनवेपर्यंत अजितदादांनी चहावाल्याशी संवाद साधायला सुरुवात केली. टपरीवर आणखी काय स्पेशल मिळते, असे विचारल्यावर इथे भजी आणि खिचडी फेमस असल्याचे चहावाल्याने सांगितले. तेव्हा गरम गरम भज्यांचाही दादांनी यावेळी आस्वाद घेतला.

Chandrakant Funde
22 जानेवारी, हिंगोली : राष्ट्रवादीचे दादा नेते अजितदादा पवार सध्या हल्लाबोल यात्रेच्या निमित्ताने ग्रामीण महाराष्ट्र पिंजून काढताहेत. काल परवाही ते हिंगोलीच्या दौऱ्यावर होते. कालची माहूरची सभा आटोपल्यानंतर अजितदादांच्या गाड्यांचा ताफा हिंगोलीकडे निघाला होता. पण प्रवासादरम्यान अजितदादांना अचानक कॉफी पिण्याची तलफ झाली. पण त्या रस्त्यावर जवळपास कुठेच ठिकठिक हॉटेल दिसत नव्हतं. बराचकाळ असाच गेल्यानंतर रस्त्यावर अचानक कळमनुरी तालुक्यातील माळेगाव फाट्यावर गाडी थांबवायला सांगितली खरंतर या आडमार्गावरच्या टपरीवर खरंच कॉफी मिळणार का, याबाबत स्वतः ड्रायव्हरही काहिसा साशंक होता. पण सुदैवाने तिथं कॉफी होती. मग अख्खा ताफाच तिथं थांबला. आता दस्तुरखुद्दच अजित पवारच कॉफी प्यायला थांबले म्हटल्यावर मग टपरीवालाही चांगलाच हरखून गेला.नेतेमंडळी गाडीने जाताना काचही खाली करत नाहीत. सामान्य माणूस जिथे वावरतो अशा ठिकाणी कार्यक्रमाव्यतिरीक्त शक्यतो जात नाहीत, असा गैरसमज लोकांना असतो. मात्र अजितदादांनी हा समज मोडीत काढत टपरीवर लोकांमध्ये बसून कॉफी प्यायल्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला कॉफी बनवेपर्यंत अजितदादांनी चहावाल्याशी संवाद साधायला सुरुवात केली. टपरीवर आणखी काय स्पेशल मिळते, असे विचारल्यावर इथे भजी आणि खिचडी फेमस असल्याचे चहावाल्याने सांगितले. तेव्हा गरम गरम भज्यांचाही दादांनी यावेळी आस्वाद घेतला.अजितदादा हे खरंतर काहिसं परखड आणि माध्यमांपासून चारहात दूरच राहणारं राजकीय नेतृत्वं...प्रसिद्धीचीही त्यांनी कधीच पर्वा केली नाही. पण सत्ता गेली की म्हणतात ना, भलेभले जमिनीवर येतात. मग आता त्याला आपले रांगडे अजितदादा तरी कसे अपवाद असणार, अर्थात सत्ताधारी अजितदादांच्या या रस्त्यावरच्या कॉफी पिण्याला कदाचित स्टटंबाजी म्हणून हिनवतीलही पण, जी मंडळी अजितदादांना जवळून ओळखतात त्यांना तरी अजितदादा कधीच प्रसिद्धीसाठी हपापलेलं नेतृत्व वाटलं नाही पण अजितदादाही हल्ली सुप्रिया ताईंच्या सेल्फीविथखड्डे अभियानात सहभागी होण्यासाठी धनजंय मुंडेंसोबत का होईना पण खड्ड्यापाशी उभे राहून सेल्फी पोज देऊ लागलेत. ही बाब अनेकांच्या नजरेतून सुटलेली नाही असो, या निमित्ताने राष्ट्रवादीची नेतेमंडळी ग्रामीण भागात फिरून सामान्य जनतेच्या समस्या जाणून घेऊ लागलीत हेही नसे थोडके.

 

Trending Now