अखेर १२ तासांनंतर पश्चिम रेल्वे रुळावर !

दुपारी 2.30वाजेच्या सुमारास हार्बरची लाईनवरची पहिली लोकल सुटली. अखेर बारा तासानंतर पश्चिम रेल्वे रुळावर आली.

Sachin Salve
मुंबई, 03 जुलै : अंधेरी पूल दुर्घटनेनंतर तब्बल १२ तासांनंतर अंधेरीहून चर्चगेटच्या दिशेने पहिली लोकल रवाना झाली. रात्री ८ वाजताच्या सुमारास जलद मार्गावरून ही लोकल चर्चगेटच्या दिशेने निघाली, अशी माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली.रात्री ८ वाजेपर्यंत हार्बरसह 3 ट्रॅक वाहतुकीसाठी खुले करण्यात यश आलं. साधारण १२ तासांनंतर अंधेरी आणि विलेपार्लेदरम्यान चर्चगेटच्या दिशेने लोकलसेवा पुन्हा सुरू झाली. त्याआधी गोरेगाव ते विरार आणि चर्चगेट ते वांद्रे या दरम्यान लोकलसेवा सुरू करण्यात आली होती.

अंधेरीत पादचारी पुलाचा काही भाग रेल्वे रुळावर कोसळला !

सकाळी 7.30 वाजता मुंबईत सकाळपासूनच एकीकडे संततधार सुरू होती. तर दुसरीकडे कामावर जाण्यासाठी मुंबईकरांची लगबग...त्याचवेळी अंधेरी पश्चिम आणि पूर्वेला जोडणारा गोखले पुलाचा काही भाग रेल्वे ट्रॅकवरच कोसळला...ओव्हरहेड वायर तुटली...आणि पश्चिम रेल्वे पूर्णपणे ठप्प झाली.

 मुंबईच्या देवदुताला रेल्वेचा सलाम, चंद्रशेखर सावंत यांना 5 लाखांचं बक्षीस

या दुर्घटनेत 6 जण जखमी झाले. मोटरमन चंद्रशेखर सावंत यांच्या सतर्कतेमुळे मोठी जीवितहानी टळली.

सकाळी 10.00वाजता एनडीआरएफ टीम दाखल  ट्रॅकवरचा ढिगारा हटवण्याचं काम सुरू झालं. पण कोलमडलेली रेल्वे अख्खा दिवस सावरलीच नाही.दुपारी 2.30वाजेच्या सुमारास हार्बरची लाईनवरची पहिली लोकल सुटली. अखेर बारा तासानंतर पश्चिम रेल्वे रुळावर आली.परंतु, गेल्या नोव्हेंबरमध्येच या पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं होतं...तरी त्याचा काही भाग कोसळला, याचा अर्थ झालेलं ऑडिटच चुकीचं होतं का?या घटनेची नेमकी जबाबदारी कुणाची...रेल्वेची की मुंबई महापालिकेची?...भले ती कुणाचीही असो...पण, मुंबईकरांना बुलेट ट्रेनचं स्वप्न दाखवणारे राजकारणी मुंबईकरांना पायाभूत सुविधा देण्यात अपयशी ठरलेत एवढं मात्र नक्की.

Trending Now