निकृष्ट जेवणाची तक्रार करणारा जवान बडतर्फ

तेजबहादुर यादव याने एक व्हिडिओ प्रसिद्ध केला होता. यामध्ये जवानांना कशा पद्धतीने निकृष्ट जेवण दिलं जात याबद्दल खुलासा केला होता

Sachin Salve
19 एप्रिल : जवानांना कँटिनमध्ये दिलं जाणाऱ्या खराब जेवणाबद्दल व्हिडिओ स्टिंग करणारा बीएसएफचा जवान तेज बहादुर यादवला बडतर्फ करण्यात आलंय.जानेवारी महिन्यात बीएसएफचा जवान तेजबहादुर यादव याने एक व्हिडिओ प्रसिद्ध केला होता. यामध्ये जवानांना कशा पद्धतीने निकृष्ट जेवण दिलं जात याबद्दल खुलासा केला होता. सीमेवर अहोरात्र आम्ही पहारा देतो पण निकृष्ट जेवण दिलं जातं असा आरोप त्याने केला होता. तेजबहादुरच्या व्हिडिओमुळे एकच खळबळ उडाली होती. केंद्र सरकारने तातडीने या प्रकरणाची चौकशी सुरू केली.नेटवर्क 18 शी बोलताना तेजबहादुरची पत्नी शर्मिला यांनी आपल्या पतीवर झालेली कारवाई ही कोर्टमार्शल असल्याचा दावा केलाय. अशा कारवाईमुळे कोणतीही आई आपल्या मुलाला सैन्यात पाठवणार नाही अशी व्यथा तिने मांडली.

दरम्यान, या प्रकरणी बीसएफने गृहमंत्रालयाला एक रिपोर्ट पाठवला होता. मात्र यानंतर तेज बहादुर यादवने आपल्यावर व्हिडिओ मागे घेण्य़ासाठी दबाव टाकला जातोय असा आरोप केला होता.परंतु, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी सुरू आहे. चौकशीवर कोणताही परिणाम होऊ नये यासाठी तेजबहादुर यादवला कॅम्प ड्युटीवरुन हटवून हेडक्वाॅटरमध्ये तैनात केलंय.

Trending Now