भाषण नको, 'राफेल' घोटाळा झाला की नाही ?, राहुल गांधींचा मोदींना थेट सवाल

" सत्तेत असल्याचं विसरून मोदी विरोधी पक्षात असल्या सारखं बोलताय. लोकसभेत तुम्ही देशाला प्रश्न विचारू शकत नाही, देशातील लोकांना उत्तर दिली पाहिजे"

Sachin Salve
07 फेब्रुवारी : लोकसभेत तुम्ही दीड तास भाषण केलं, पण तुम्ही देशाच्या जनतेला प्रश्न विचारू शकत नाही. 2 कोटी रोजगाराचं काय झालं ?, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव देणार की नाही ?, राफेल खरेदीत गैरव्यवहार झाला की नाही ?, असा थेट सवाल काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारलाय.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत भाषण करून काँग्रेसवर घणाघाती प्रहार केला. आपल्या भाषणात मोदींनी सोनिया गांधी, राहुल गांधी आणि गांधी घराण्यावर सडकून टीका केली. लोकसभेबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना जशाच तसे उत्तर देत थेट सवाल विचारला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मी तीन प्रश्न विचारले होते. पण त्यांनी आज फक्त राजकीय भाषण केलं. एखाद्या राजकीय कॅम्पेन सारखं भाषण केलं. पण देशासमोर रोजगाराचा प्रश्न आहे, बंगाल, कर्नाटकाचा मुद्दा आहे. मोदींनी सत्तेवर येण्याआधी 2 कोटी नोकऱ्या देण्याचं आश्वासन दिलं होतं. याबद्दल मोदींनी एक शब्दही उच्चारला नाही. शेतकऱ्यांचा मालाला भाव, कर्जमाफीवर पंतप्रधान बोललले नाही. शेतकऱ्यांच्या हिताचं मोदी बोलत नाही आम्हाला याची उत्तर हवी असा पलटवार राहुल गांधींनी केला.

प्रत्येक वेळी मोदी भाषण करतात आणि काँग्रेसवर टीका करतात, काँग्रेस नेत्यांवर टीका करतात. ठीक आहे तुम्ही आमच्यावर टीका करा  पण, रोजगार, शेतकरी, राफेल खरेदीत गैरव्यवहार झाला की नाही यावर मोदी बोलत नाही. राफेल खरेदीसाठी तुम्ही पॅरिसला गेला होता त्यावर बोलत का नाही ?, संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण म्हणतात हा देशासाठी गुप्त करार आहे त्यावर मोदी का बोलत नाही ? असा थेट सवाल राहुल गांधींनी मोदींना विचारला.सत्तेवर येणाआधी मोदी काँग्रेसच्या 60 वर्षांच्या कार्यकाळावर बोलतात. पण आज मोदी सरकारला चार वर्ष झाली आहे. त्यांनी काय काम केलं यावर बोललं पाहिजे. पण सत्तेत असल्याचं विसरून मोदी विरोधी पक्षात असल्या सारखं बोलताय. लोकसभेत तुम्ही देशाला प्रश्न विचारू शकत नाही, देशातील लोकांना उत्तर दिली पाहिजे असा सल्लावजा टोलाही राहुल गांधींनी लगावला.

Trending Now