केरळवर अतिवृष्टीनंतर आता रोगराईचं सावट

दूषित पाण्यामुळे होणारे रोग पसरू नयेत यासाठी ब्लिचिंग पावडर मुबलक प्रमाणात आवश्यक आहे

केरळ, २१ ऑगस्ट- केरळमध्ये आता पावसाचा जोर कमी झालाय. त्यामुळे मदतकार्याला वेग आलाय. पण सगळ्यात मोठी समस्या आहे ती रोगराई पसरण्याची. ठिकठिकाणी साचलेले चिखलाचे ढिगारे उपसणं आणि लोकांची घरं राहण्यालायक करणं हे एक मोठं आव्हान प्रशासनासमोर आहे. दूषित पाण्यामुळे होणारे रोग पसरू नयेत यासाठी ब्लिचिंग पावडर मुबलक प्रमाणात आवश्यक आहे. मदत छावण्यांमध्ये आवश्यक ती औषधं पुरवायला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत ९० अत्यावश्यक औषधं केरळमध्ये पोहोचली आहेत. पण पुराचा तडाखा बसलेली घरं पूर्ववत करणं आणि रोगाचा संसंर्ग होण्यापासून रोखणं ही दोन मोठी आव्हानं आहेत.पूरग्रस्तांच्या मदतीसाठी महाराष्ट्रातून डॉक्टरांचं एक पथक केरळमध्ये दाखल झालंय. या पथकासोबत मंत्री गिरीश महाजनही केरळला गेले होते. मदत नेमकी कुठे आणि कोणत्याप्रकारची हवी आहे, याबाबत महाजन केरळ सरकारशी समन्वय साधतील. महाराष्ट्रानं केरळला याआधीही मदतीचा हात दिला होता. राज्य सरकारनं केरळला २० कोटींची मदत जाहीर केली होती, तसंच साडे सहा टन अन्नधान्य विमानानं केरळला पाठवण्यात आलं होतं.गेल्या १०० वर्षांतला केरळमधील हा सर्वात भीषण पूर असल्याचे मुख्यमंत्री पिनरयी विजयन यांनी म्हटले आहे. केरळ सरकारने केंद्र सरकारकडे अजून ११ हेलिकॉप्टरची मागणी केली आहे. दरम्यान, केरळमधील पुरस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी राज्याच्या पूरस्थितीची हवाई पाहणी केली. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्याशी फोनवरुन बोलणे झाल्यावर केलेल्या ट्विटमध्ये मोदी यांनी म्हटले आहे की, केरळमधील स्थितीवर केंद्र सरकार सातत्याने लक्ष ठेवून आहे.

Trending Now