संघ परिवाराकडून अखेर राहुल गांधींना अधिकृत निमंत्रण

मलिकार्जुन खरगे, ममता बॅनर्जी, अखिलेश चंद्राबाबूंनाही धाडलं निमंत्रण

News18 Lokmat
नवी दिल्ली, ०८ सप्टेंबर- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दिल्लीतील विज्ञान भवनात १७ ते १९ सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या कार्यकर्मासाठी ३ हजार लोकांना आमंत्रित करण्यात आले आहे. राजकारण, समाजकारण आणि धार्मिक क्षेत्रातील लोकांना हे निमंत्रण पाठविण्यात आले आहे. यात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, काँग्रेस नेते मलिकार्जुन खरगे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव आणि आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा समावेश आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा, संघाच्या संस्थांकडून सुरु असेलल्या कामांची माहिती सर्व विरोधी विचारांच्या नेत्यांना देण्यासाठी हे आयोजन करण्यात आले असल्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सांगितलं आहे.भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीकेची एकही संधी न सोडणारे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आता या कार्यक्रमाला जाणार का हा सर्वात मोठा प्रश्न सर्वांसमोर उभा राहिला आहे. नवी दिल्लीत संघाचे 'फ्युचर आॅफ भारत' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला सर्वपक्षीय नेत्यांना आमंत्रण देण्यात आलीये. संघाने याआधी जून महिन्यात नागपूरमध्ये संघाच्या मुख्यालयात माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना बोलावले होते. या कार्यक्रमात प्रणवदांनी राष्ट्रवाद या विषयावर भाषण दिले होते.काही दिवसांपूर्वीच उद्योगपती रतन टाटा हेही संघाच्या कार्यक्रमात हजर झाले होते. मुंबईत संघाशी संबंधीत 'नाना पालकर स्मृती समिती' च्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्ताने कार्यक्रमात मोहन भागवत यांच्यासोबत सहभागी झाले होते. या कार्यक्रमात रतन टाटा हेही भाषण करणार होते. पण त्यांनी भाषण करणे टाळले होते.

दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशाची रचनाच बदलण्याच्या प्रयत्नात आहे. देशातील इतर कोणत्याही संघटनेला देशाच्या स्वायत्त संस्थांवर नियंत्रण ठेवायचे नाही, संघ सोडून. संघाची विचारधारा ही अरब राष्ट्रांत असलेल्या कट्टर मुस्लिमवाद्यांच्या संघघटनेसारखीच (मुस्लिम ब्रदरहुड) आहे, असे गंभीर आरोप काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी लंडन दौऱ्यावर असताना केले होते. यावरून भाजपने संताप व्यक्त केला असून राहुल गांधी अपरिपक्व असून त्यांनी या विधानावर माफी मागण्याची मागणी केली होती. संघाची तुलना मुस्लिम ब्रदरहुडसोबत केल्यामुळे संघाने आता थेट राहुल गांधी यांना व्यासपीठावर येण्याचे आमंत्रण दिले आहे. त्यामुळे राहुल गांधी हे आमंत्रण स्वीकारतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Trending Now