सीमारेषेजवळील पाकच्या चौक्या उद्धवस्त करुन भारताने घेतला बदला

Samruddha Bhambure
08 मे : पाकिस्तानने दोन भारतीय जवानांचा शिरच्छेद करण्याचे अमानवी कृत्य केल्यानंतर भारताकडून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले जात आहे.  भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईत सीमारेषेवरील पाकच्या चौक्या उद्धस्त झाल्या आहेत. हे दाखवणारा एक व्हिडिओच आता भारतीय लष्करानं जारी केला असून हा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.या चौक्यांना लक्ष्य करण्यासाठी भारताने अँटी टँक गायडेड मिसाईल्सचा वापर केल्याचं सांगण्यात येत आहे. तसंच, या हल्ल्यात पाकिस्तानी बंकर्स पूर्णपणे उद्धस्त झाल्याचेही दिसत आहे.या महिन्यात पाकिस्तानने सीमारेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याचे अनेक प्रकार घडले आहेत. 1 मे रोजी जम्मू-काश्मीरच्या कृष्णा घाटी सेक्टरमध्ये पाकिस्तानी लष्कराने भारतीय चौक्यांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात भारताचे दोन जवान शहीद झाले होते. यावेळी पाकने शहीद झालेल्या जवानांच्या मृतदेहांची विटंबना केली होती. त्यामुळे पाकिस्तानविरोधात भारतात तीव्र संतापाची लाट उसळली असून पाकिस्तानच्या या नापाक कृत्याचं भारतीय  सैनिकांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

दरम्यान, जम्मू-काश्मीरच्या नौशेरा सेक्टरमध्ये सोमवारी सकाळी पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. यावेळी भारतीय सैन्याकडून पाकला सडेतोड प्रत्युत्तर देण्यात आले. भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईत पाकच्या सीमारेषेवरील चौक्या पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या आहेत.

Trending Now