LIVE : भाजप देशभर काढणार अटलजींच्या अस्थिच्या कलश यात्रा

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरूदास कामत यांचं आज ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं.

11:32 (IST)

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री अरूण जेटली यांनी तीन महिन्यानंतर आज अर्थमंत्रालयाचा कारभार पुन्हा एकदा स्वीकारला. किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिय झाल्यानंतर ते आपल्या निवासस्थानीच आराम करत होते. संसर्गची शक्यता असल्याने जेटलींना डॉक्टरांनी घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला होता. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरूण जेटली यांच्याकडचा कार्यभार तात्पुरता पीयुष गोयल यांच्याकडे दिला होता. त्यामुळं जेटली हे बिनखात्याचे मंत्री होते. घरी असतानाही ते फेसबुकवर पोस्टच्या माध्यमातून अनेक विषयांवर आपली मतं व्यक्त करत होते.

11:08 (IST)

कुर्ग : दक्षिण कर्नाटकमधलं थंड हवेचं ठिकाण कूर्गमध्येही पावसानं हाहाकार माजवला आहे. मडिकेरी जिल्ह्यातले अनेक महत्वाचे रस्ते घाट स्वरुपाचे आहेत.. यातले अनेक रस्ते अक्षरशः वाहून गेलेत किंवा खचले आहेत. सोमवारपेट, विराजपेटला जायचे रस्ते बंद आहेत.. चिखल हटवण्याच्या कामालाच एवढा वेळ लागतोय की हे रस्ते पुन्हा बांधून तयार व्हायला खूपच वेळ लागणार आहे, हे निश्चित.कूर्ग अर्थात मडिकेरी भागात जीवनावश्यक वस्तू पुरवण्यासाठी केंद्र सरकारनंही मदत पाठवली आहे. मैसूर हवाई तळावर वायुदलाची 2 मोठी विमानं काल लँड झाली. खायच्या वस्तू, धान्य, साबण, सॅनिटरी नॅपकिन अशा अनेक महत्वाच्या वस्तू आता मैसूरहून मडिकेरीला पाठवण्यात येत आहेत. 

11:07 (IST)

कोच्ची : केरळमध्ये प्रचंड पावसाच्या तडाख्याने १४.५० लाख लोक विस्थापित झालेत. ते सध्या ३,८७९ निवारा शिबिरांमध्ये राहात आहेत. पुरात अडकलेल्यांची सुटका करण्याचे मदतकार्य आता जवळजवळ आटोपतं घेण्यात आलंय. सार्वजनिक ठिकाणी तसेच घराघरांत जो प्रचंड कचरा वाहून आला आहे त्याची सफाई करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. जे लोक घर सोडून गेले होते, ते आता परतायला लागलेत.. पण घरातलं चित्र फारसं आशादायक नाही. कारण पै पै जमवून घेतलेल्या महागड्या वस्तू संपूर्णपणे खराब झाल्या आहेत.. टीव्ही, फर्निचर, एसी, कॉम्प्युटर, पदडे... पावसाच्या पाण्यानं सगळंच बाद केलंय.. हजारो कुटुंब अशी आहेत ज्यांचं नुकसान लाखोंमध्ये गेलं आहे.. दुचाकी आणि चारचाकी गाड्यांचंही मोठं नुकसान झालंय.. आता या सर्वांवर विमा कंपन्यांकडून पैसे मंजूर करून घ्यायची अतिरिक्त जबाबदारी येऊन पडली आहे. 

09:57 (IST)

नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरूदास कामत यांचं आज ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं. अस्वस्थ वाटू लगाल्यानं त्यांना नवी दिल्लीतल्या चाणक्यपुरीमधल्या प्रायमस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्याच दरम्यान त्यांचं निधन झालं. ते 63 वर्षांचे होते. मुंबई काँग्रेसचे दिर्घकाळ अध्यक्षपद त्यांनी भुषवलं होतं. काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा यांचे ते वडील होते. 1972 मध्ये त्यांनी विद्यार्थी नेते म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरवात केली. गांधी घराण्याचे ते विश्वासू म्हणून ओळखले जात. राजीव गांधींचे जवळचे मित्र होते. खासदार, केंद्रात मंत्री आणि पक्षातही विविध पदांवर त्यांनी काम केलं. मुंबईत काँग्रेस वाढवण्यात त्यांचा मोठा वाटा होता. 1987 मध्ये त्यांनी महाराष्ट्र युवक प्रदेश काँग्रेसचं अध्यक्षपद भुषवलं होतं.

09:56 (IST)

नवी दिल्ली : नासाच्या शास्त्रज्ञांनी चंद्रावर गोठलेलं पाणी आढळल्याच्या माहितीला दुजोरा दिला आहे. भारताकडून नासाच्या १० वर्षांपुर्वी प्रक्षेपित करण्यात आलेल्या अंतराळ यान चांद्रयान-१ कडून मिळालेल्या माहितीच्या आधारे हा निष्कर्ष काढला आहे. नासानं चंद्राच्या सर्वात थंड आणि अंधाऱ्या ध्रुवीय क्षेत्रात गोठलेल्या अवस्थेत पाणी आढळल्याची माहिती दिली आहे. 'पीएनएएस' जर्नलमध्ये प्रकाशित लेखात बर्फ इकडे तिकडे विखुरलेल्या अवस्थेत असल्याचं सांगण्यात आलं आहे. 

09:43 (IST)

नवी दिल्ली :  नीट परीक्षेवरून केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने पुन्हा एकदा यू-टर्न घेतला आहे. आता नीटची परीक्षा वर्षातून एकदाच घेण्यात येणार असल्याचं जाहीर करण्यात आलंय. तसंच ही परीक्षा ऑनलाइन होणार नसून विद्यार्थ्यांना लेखी परीक्षा द्यावी लागणार असल्याचं मनुष्यबळ विकास मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. विशेष म्हणजे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सूचनेनंतर मनुष्यबळ विकास मंत्रालयाने हा निर्णय फिरवल्याचं समजतंय. या निर्णयामुळं विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. 

09:40 (IST)

कोच्ची : केरळमधील महापुरामुळे तेथून होणाऱ्या मसाल्यांची आवक थांबली आहे. वेलची २०० तर वेलदोडे १५० रुपयांनी महागलेत. लवंग, काळे मिरी, जायपत्री या मसाल्यांचीही टंचाई निर्माण झाली आहे. केरळमधील वेलदोडा, वेलची, जायपत्री, लवंग हे मसाले जगभरात प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्रातही लवंग वगळता बाकीचे मसाले केरळहून येतात. गेल्या आठ दिवसात ही आवक पूर्णपणे थांबली आहे. पुरवठ्यावर परिणाम झाल्याने बाजारात दर वाढताहेत. वेलचीचा घाऊक दर १५०० रुपये प्रतिकिलोवरून १७०० रुपयांवर गेला आहे. 

नवी दिल्ली,22 ऑगस्ट : माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाला सात दिवस झाले आहेत. भाजप पूर्ण देशभर अटलजींच्या अस्थिंची कलशयात्रा काढणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी आज भाजपच्या मुख्यालयात सर्व राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांना अस्थी कलश सोपवले. त्याचबरोबर देशभर श्रद्धांजली सभांचंही आयोजन करण्याचा निर्णय भाजपने घेतलाय. वाजपेयींचं 16 ऑगस्टला निधन झालं होतं. 19 ऑगस्टला हरिव्दारमध्ये वाजपेयींच्या अस्थिंच विसर्जन करण्यात आलं होतं. देशातल्या प्रमुख नद्यांमध्येही अस्थिंचं विसर्जन करण्यात येणार आहे.

Trending Now