07 ऑक्टोबर : मोदींवर शहिदांच्या रक्ताच्या दलालीचा आरोप करणारे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी पलटवार केला आहे. राहुल यांनी लष्कराचे जवान आणि देशाच्या जनतेचा अपमान केला आहे. दलाली तर काँग्रेसच्या रक्तात भिनली आहे, असं शाह म्हणाले.
राहुल गांधी यांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी शाह यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी राहुल गांधींना चांगलेच खडेबोल सुनावले आहेत.
सर्जिकल स्ट्राइकवर संशय व्यक्त करत सर्वप्रथम दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भारताने सर्जिकल स्ट्राइकची कारवाई केली असेल तर त्याचे पुरावे द्यावे, अशी मागणी केली होती. त्यानंतर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी ‘भाजप सरकार जवानांच्या रक्ताची दलाली करतेय’, असं विधान केलं होतं. त्याला उत्तर देताना अमित शाह यांनी, कोळसा घोटाळा ते २ जी; तसंच बोफोर्स घोटाळ्यात कुणी दलाली केली? खरं तर काँग्रेसच्या रक्तातच दलाली भिनली आहे, अशी टीका केली. त्याचबरोबर, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला. केजरीवालांनी सर्जिकल स्ट्राइकचे पुरावे मागणं हे दुर्दैवी आहे. कुणीही लष्कराच्या कर्तृत्वावर शंका उपस्थित करू नये, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
दरम्यान, सरकारने या कारवाईचे श्रेय घेतलं नसल्यानेच कोणताही मंत्री किंवा लष्करप्रमुखांऐवजी लष्करातील डीजीएमओ यांच्याकडून या कारवाईची माध्यमांना माहिती देण्यात असल्याचंही शाह यांनी स्पष्ट केलं आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv