'आप'ची 'पॉवर' : दिल्लीकरांना अर्ध्या दरात वीज

Sachin Salve

31 डिसेंबर : आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर कामाचा धडाका लावलाय. मोफत पाणीच्या निर्णयानंतर केजरीवाल यांनी दिल्लीकरांना नववर्षाची आणखी एक भेट दिली आहे. जाहीरनाम्यात दिलेलं वचनपूर्ण करत दिल्लीमध्ये वीजदरात 50 टक्के कपात करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय 'आप' सरकारने घेतला आहे. आता दिल्लीकरांना 400 युनिटपर्यंत 50 टक्के सवलत मिळणार असून यामुळे 28 लाख ग्राहकांना फायदा होणार आहे. तसंच वीज कंपन्यांचं ऑडिटही होणार असून याला कॅगने मान्यता दिली आहे.

दिल्लीकरांना 700 लीटर पाणीपुरवठ्याचं आश्वासन पूर्ण केल्यानंतर आता अरविंद केजरीवाल सरकारने दुसरं आश्वासनही पूर्ण केलं आहे. आज दुपारी दिल्लीत वीज पुरवठा करणार्‍या तिन्ही कंपन्यांचं ऑडिट करण्याची घोषणा केजरीवाल यांनी केलीय. त्यासाठी कॅगसोबत मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आणि आप च्या निर्णायाला कॅगने मंजुरीही दिली आहे.

त्यानंतर केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन दिल्लीत वीजदरात 50 टक्के कपात करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला. 400 युनिटपर्यंत वीज वापरणार्‍यांना 50 टक्के सवलत मिळणार आहे. दिल्लीत एकूण 34 लाख ग्राहक असून यापैकी 28 लाख ग्राहकांना याचा फायदा होणार आहे. आपच्या या निर्णयामुळे भाजप, काँग्रेसने आक्षेप घेतल्याचं कळतंय. काँग्रेस-भाजप सरकार पाडण्याच्या तयारीत आहेत, असा आरोप केजरीवाल यांनी केलाय. जर भाजप, काँग्रेसनं सरकार चालवू दिलं नाही तरी हातात अजून 48 तास आहे. याकाळात लोकहिताचे निर्णय घेणार असून आम्हाला जे हवंय ते आम्ही करुनच राहू असंही केजरीवाल यांनी स्पष्ट केलं.

Trending Now