'मामा' वाद- विजय चव्हाणांना भेटण्यावरून जितेंद्र जोशीने सचिन कुंडलकरला फटकारलं

दर आठवड्याला कोणी ना कोणी मामा-मावशी असतात, सगळेच कसे मामा, मावशी होतात असं त्यांनी लिहिलं. त्याला अनेकांनी प्रत्युत्तर दिलं. त्यावर टीकाही केली.

मुंबई, 25 आॅगस्ट : ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचं निधन झाल्यानंतर सर्वच कलाकारांनी आपला शोक व्यक्त केला होता. त्यावर दिग्दर्शक सचिन कुंडलकरनं एक फेसबुक पोस्ट टाकली होती. अभिनेते विजय चव्हाण आजारी असताना किती लोक त्यांना भेटायला गेले, असा सवाल करत दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांनी विजूमामा म्हणत शोक व्यक्त करणाऱ्यांना उपरोधानं फटकारले. आता मामा मामा म्हणणारे ते आजारी असताना कुठे होते असा सवाल कुंडलकरांनी विचारला होता. शिवाय रंगभूमी पोरकी झाली हे म्हणणं बोअरिंग आहे, असंही त्यांनी लिहिलं. दर आठवड्याला कोणी ना कोणी मामा-मावशी असतात, सगळेच कसे मामा, मावशी होतात असं त्यांनी लिहिलं. त्याला अनेकांनी प्रत्युत्तर दिलं. त्यावर टीकाही केली.

अभिनेता जितेंद्र जोशीनं हे आमचे संस्कार असून आम्ही मामा, मावशी म्हणणारच असं सचिन कुंडलकरना सुनावलं आहे. जितेंद्र म्हणालाय,  'एकीकडे "मोरुची मावशी" केलं तर दुसरीकडे विजयाबाईंसोबत "हयवदन" सुद्धा केलं. ज्या गोष्टीमुळे आपली ओळख आहे तो "नाटक" नावाचा प्रकार माहितही नसलेल्या लोकांसमोर काम करुन त्यांचं मनोरंजन केलं. नाटक, त्यातलं काम, अभिनय या विषयावर उत्तमोत्तम भाषणे करणारे स्वतः काम करताना निष्प्रभ होतात आणि "विजुमामा" सारखे नट बोलत नाहीत तर करून दाखवतात.  मी एकाच चित्रपटात काम केलं त्यांच्यासोबत परंतु तरीही ते माझे विजुमामा झाले कारण त्यांनी माझ्यासारख्या नवख्या मुलाची प्रचंड काळजी घेतली. बरं बाकी अशोक "मामा", नीना "ताई" , वंदना "मावशी" , मोने "काका" यांच्याविषयी नंतर कधीतरी सांगीन तुम्हाला.  राहता राहिला प्रश्न अमेय, उमेश यांच्या काका आणि स्पृहा, सई, अमृता, पर्ण यांच्या मावश्या /आत्या होण्याचा तर माझी मुलगी आत्तापासूच त्यांना अशीच हाक मारते याचं कारण संस्कार!!'

चिन्मयी सुमित, विद्याधर जोशी अशा अनेकांनी सचिन कुंडलकरवर टीकाच केलीय.शुक्रवार 24 आॅगस्टला ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ६३ वर्षांचे होते.

Trending Now