मुंबईतल्या उंच इमारती मृत्यूचा सापळा? अग्निशमन सुरक्षा वाऱ्यावर

कोट्यवधी रूपये खर्च करून या इमारती बांधल्या जातात मात्र त्यात अग्निसुरक्षेची काहीही काळजी घेतली जात नाही.

मुंबई,ता,22 ऑगस्ट : फ्लॅस्ट्सची किंमत काही कोटींमध्ये, हाय फाय सुविधा, महिन्याला प्रचंड मेंट्नन्स, मजल्यानुसार वाढत जाणाऱ्या किंमती, डोळे दिपवणाऱ्या जाहीराती आणि एवढा पैसा खर्च करून सुरक्षेची मात्र ऐसितैसी. ही परिस्थिती आहे मुंबईतल्या उंच इमारतींची. गेल्या काही महिन्यांमध्ये मुंबईतल्या काही अलिशान उंच इमारतींना आग लागली, त्यात काही मृत्यूही झाले मात्र या इमारतींमधल्या अग्निरोधक यंत्रणा कुचकामी ठरल्याचं भीषण वास्तव समोर आलं असून या इमारती म्हणजे मृत्यूच्या सापळा ठरणार आहेत का असा सवाल आला रहिवाशी विचारत आहेत. कमला मील रेस्टॉरंट, अलिशान ब्ल्यू माँड आणि आज लागलेल्या क्रिस्टल टॉवरच्या आगीत हे भीषण वास्तव पुढे आलं आहे. कोट्यवधी रूपये खर्च करून या इमारती बांधल्या जातात मात्र त्यात अग्निसुरक्षेची काहीही काळजी घेतली जात नाही.थातूर मातूर काम केलं जातं आणि लोक या महागड्या फ्लॅट्समध्ये राहायला येतात. मुंबईत 20 पेक्षा जास्त मजल्यांच्या शेकडो इमारती आहे. आणि मुंबई अग्निशमन दलाकडे फक्त 20 मजल्यापर्यंतच उंच शीडी आहे. वरच्या मजल्यावर आग लागल्यास तिथल्या स्वयंचलित यंत्रणेनेच कार्यरत व्हावं असं अपेक्षीत असतं मात्र ते काहीही होत नाही आणि आग लागली तर त्यात माणसांचे बळी जातात.आज क्रिस्टल टॉवरला लाग लागली आणि त्यात 4 जणांचा बळी गेला. या इमारतीततली अग्निशमन यंत्रणा कुचकामी ठरल्याचं अग्निशमन विभागाने सांगितलंय. गेल्या पाच वर्षापासून आम्ही याबाबत तक्रार करतोय मात्र त्याची दखल घेण्यात आली नाही अशी तक्रार या इमारतीत राहणारे रहिवाशी जितेंद्र चव्हाण यांनी केलीय.

योग्य अग्निशमन सुरक्षेची उपाययोजना केलेल्या नसताना या इमारतींना परवानग्या दिल्याच कशा असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत असून महापालिका आणि अग्निशमनदलाला आपली जबाबदारी झटकता येणार नाही असं तज्ज्ञांचं मत आहे.

Trending Now