मुंबई : 32 मजले चढून फायर ब्रिगेडच्या जवानांनी मिळवलं आगीवर नियंत्रण, दोन जवान जखमी

मुंबईतल्या प्रभादेवी परिसरात बो मोंड टॉवर्सला लागलेल्या आगीने अग्निशमन दलाच्या हायराईज टॉवर्समधील आग विझवण्यासंबंधीच्या मर्यादा पुन्हा एकदा स्पष्ट झाल्या आहेत.

Ajay Kautikwar
मुंबई,ता.13 जून : मुंबईतल्या प्रभादेवी परिसरात बो मोंड टॉवर्सला लागलेल्या आगीने अग्निशमन दलाच्या हायराईज टॉवर्समधील आग विझवण्यासंबंधीच्या मर्यादा पुन्हा एकदा स्पष्ट झाल्या आहेत.आग भडकत असल्याने फायर ब्रिगेडच्या जवानांनी शेवटी तब्बल 32 मजले चढत वर जावून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यात दोन जवान जखमी झाले. शेवट आगीवर नियंत्रण मिळवण्यावर फायर ब्रिगेडला यश आलं.

फायर ब्रिगेडकडे फक्त 20 ते 25 मजल्यापर्यंत पोहोचण्यासाठी शिडी आहे. त्यामुळं त्यापुढच्या मजल्यांवर आग लागली तर त्यावर नियंण कसं मिळवावं हा फायर ब्रिगेडसमोर मोठा प्रश्न आहे. या आगीत सुदैवानं कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. मात्र आग विझवताना अग्निशमन दलाचे दोन कर्मचारी जखमी झालेत.मुंबईत गगनचुंबी इमारतींची संख्या प्रचंड आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून फायर ब्रिगेडकडे जेवढी क्षमता आहे तेवढ्याच मजल्यांपर्यंत इमारत बांधण्याची परवानगी दिली जावी असं अपेक्षीत आहे. मात्र याकडे दुर्लक्ष करत थातुरमातूर उपाययोजना करून उंच इमारतींना परवानगी दिली जाते.25 पेक्षा जास्त मजल्यांवर बिल्डरनेच आग प्रतिरोधक यंत्रणा बसवणं आवश्यक आहे. मात्र बिल्डर तात्पुरत्या उपायोजना करून सुरक्षेची ऐशीतैशी करतात आणि रहिवाशांचा जीव धोक्यात येतो. यावर सरकार आणि महापालिकेनं तातडीनं उपाययोजना कराव्यात अशी मागणी आता होत आहे.  

Trending Now