मालाडमध्ये लाकडाच्या गोदामाला भीषण आग, अग्निशमन दलाच्या 10 गाड्या दाखल

मुंबई, 04 सप्टेंबर : मुंबईमध्ये मालाडच्या इंडस्ट्रियल परिसरात मोठी आग लागली आहे. बॉम्बे टॉकीज परिसरातील लाकडाच्या गोदामाला ही आग लागली असल्याचं सांगण्यात येत आहे. गुडलक इंडस्ट्रियल परिसरात ही आग लागली आहे. घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. तर पोलिसही घटनास्थळी दाखल झाले आहेत. आगीची तीव्रता जास्त असल्य़ामुळे संपूर्ण परिसर सुरक्षेच्या दृष्टीने खाली करण्यात आला आहे.सकाळी 11:15च्या सुमारास ही आग लागली असल्याचं सांगण्यात येत आहे. या परिसरात सोमवार बाजार असल्याने अनेक दुकानं आणि फॅक्ट्रीज या परिसरात आहे. मोठ्या प्रमाणात ही आग धुमसत आहे. संपूर्ण परिसरात धुराचे लोट पहायला मिळतात. अग्निशमन दलाच्या 10 गाड्यांकडून आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.

शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. हा संपूर्ण इंडस्ट्रियल परिसर असल्य़ामुळे सकाळच्या सुमारास बऱ्यापैकी लोकांची वर्दळ परिसरात होती पण आगीची माहिती मिळताच सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण परिसर खाली करण्यात आला आहे.या परिसरात अनेक दुकानं आहेत, त्यामुळे या आगीत मोठं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. अद्याप यात कोणतीही जीवित हानी झाली असल्याची माहिती देण्यात आलेली नाही. पण आग मोठी असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

Trending Now