आयएनएस कलवरी नौदलाच्या सेवेत दाखल

भारतीय नौदलाच्या ताफ्यात सध्या १३ डिझेल-इलेक्ट्रीक आणि २ आण्विक पाणबुड्या आहेत. भारताला ७ हजार ५०० किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा आहे. त्यामुळे पाणबुड्यांची भूमिका अत्यंत महत्वाची आणि युद्धपरिस्थितीत निर्णायक ठरते.

Chittatosh Khandekar

 मुंबई 13 डिसेंबर: भारतीय नौदलाच्या ताब्यात आज आयएनएस कलवरी ही पाणबुडी दाखल झाली आहे. सकाळी ८ वाजून ५३ मिनिटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या डिझेल पाणबुडीचं अनावरण करण्यात आलं  आहे. यावेळी त्यांच्या सोबत संरक्षण मंत्री निर्मला सीतारमणही उपस्थित होत्या. मुंबईत हे अनावरण करण्यात आलं.

भारतीय नौदलाच्या ताफ्यात सध्या १३ डिझेल-इलेक्ट्रीक आणि २ आण्विक पाणबुड्या आहेत. भारताला ७ हजार ५०० किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा आहे. त्यामुळे पाणबुड्यांची भूमिका अत्यंत महत्वाची आणि युद्धपरिस्थितीत निर्णायक ठरते. २००५ साली भारत आणि फ्रान्स मध्ये झालेल्या करारानुसार, फ्रान्सच्या अत्याधुनिक स्कॉर्पीन पाणबुडीचं तंत्रज्ञान हस्तांतर करून भारतीय नौदलासाठी 'कलवरी' वर्गातील डिझेल इलेक्ट्रिकवर चालणारी पाणबुडी बनवण्यात आली आहे.  मुंबईच्या माझगाव डॉकमध्येच तिच्यावर काम सुरू होतं. अशा प्रकारच्या एकुण ६ पाणबुड्या बांधण्यात येणार असून त्याचं बजेट ६ अब्ज डॉलर इतकं आहे.

यावेळी पंतप्रधान मोदींनी उपस्थितांना संबोधितही केलं. तस्करी, दहशतवाद सर्वच आघाड्यांवर भारतीय सैन्य यशस्वी लढा देत आहे असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं.  भाषण झाल्यानंतर त्यांनी पाणबुडीचं अनावरणही केलं.

  अशी आहे  आयएनएस कलवरी पाणबुडी- डिझेल आणि इलेक्ट्रिकवर चालू शकते- भारतीय नौदलातली सर्वात अत्याधुनिक पाणबुडी- इंजिनचा आवाज अतिशय कमी- शत्रूच्या रडारवर 'डिटेक्ट' होणं कठीण- लांबी 67.5 मीटर- उंची - 12.3 मीटर- काम कधी सुरू झालं ? - 14 डिसेंबर 2006- काम कुठे सुरू होतं? - माझगाव डॉक, मुंबई- डिझाईन कुणाचं - फ्रेंच कंपनी डीसीएनएस

Trending Now