गणेशोत्सव मंडळाच्या आगमन सोहळ्यात समाजकंटकांचा धुडगूस!

शनिवार 8 सप्टेंबर रोजी मुंबईत गपणतीच्या आगमन सोहळ्यादरम्यान काही समाजकंटकांनी धुडगूस घालत आणि सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केलं.

उदय जाधव, मुंबई, 9 सप्टेंबर : सध्या संपूर्ण राज्याला वेध लागले आहेत ते गणरायाच्या आगमनाचे. मात्र, शनिवार 8 सप्टेंबर रोजी मुंबईत गपणतीच्या आगमन सोहळ्यादरम्यान काही समाजकंटकांनी धुडगूस घालत आणि सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केलं. या अनुचित प्रकारामुळे गणपतीच्या आगमनाआधीच उत्सावाला गालबोट लागलंय. तर घडल्या प्रकारामुळे गणेशोत्सव मंडळांमधल्या वाढत्या स्पर्धेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.मुंबईतल्या प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळांमध्ये गणल्या जाणाऱ्या, चिंतामणीच्या राजाचं शनिवारी आगमन झालं. मात्र, गणरायाच्या आगमन सोहळ्यात समजकंटकांनी अक्षरशः धुडगूस घातला. दुभाजकावर लावण्यात आलेल्या झाडांची नासधूस करण्यात आली.कुणी बसच्या टपावर उभं राहून नाच केला, तर कुणी सुशोभिकरणासाठी लावण्यात आलेल्या मूर्तीची तोडफोड केली. दोन गटांमध्ये हाणामारी देखील झाली. बाहेरच्या तरूणांनी घुसखोरी केल्यामुळं हा सगळा अनुचित प्रकार घडल्याचा दावा मंडळाच्या सदस्यांनी केला आहे.

कार्यकर्त्यांची गर्दी जेवढी जास्त, तेवढी गणेशोत्सव मंडळाची ख्याती आणि प्रतिष्ठा मोठी असं समीकरण तयार करण्यात आलंय. मात्र कार्यकर्त्यांची गर्दी खेचताना त्यांना आवरण्याची जबाबदारीही मंडळाचीच हे नाकारून चालणार नाही. चिंतामणीच्या राजाच्या आगमन सोहळ्यादरम्यान घडलेल्या प्रकारानं उत्सवाला फक्त गालबोटच लावलं नाहीय, तर महत्त्वाचे प्रश्न देखील उपस्थित केले आहेत.- आगमन सोहळ्यादरम्यान झालेलं सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान कोण भरून देणार?- मंडळाचे सदस्य नसताना त्यांना मिरवणुकीत सामील कोणी करून घेतलं?- योग्य नियोजन नसताना एवढ्या मोठ्या आगमन सोहळ्याची गरज काय होती?जर कुणी चिंतामणीच्या राजाच्या मूर्तीमध्ये प्राण फुंकले असते, तर गणरायानं सर्वप्रथम त्याच्या हातातल्या सर्व आयुधांचा वापर करत, त्याच्या मिरवणुकीमध्ये धुडगूस घालवणाऱ्यांना अद्दल घडवली असती. या आगमन सोहळ्यात घडलेल्या प्रकारातून प्रत्येक गणेशोत्सव मंडळानं धडा घ्यायला हवा. PHOTOS : बाप्पाच्या स्वागतासाठी पुणेकर सज्ज; बाजारपेठ सजली

Trending Now