छगन भुजबळांना देशभरात कुठेही जाण्यास कोर्टाची परवानगी

मुंबई, 04 सप्टेंबर :  मुंबई हायकोर्टाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना मोठा दिलासा दिला आहे. भुजबळ यांना आता कोर्टाच्या पूर्व परवानगीशिवाय आता देशभरात कुठेही जाण्याची परवनागी देण्यात आली आहे. पण असं करताना त्यांना ईडीला पूर्वकल्पना देणं आवश्यक आहे. तसंच जात असलेल्या ठिकाणचा पत्ता आणि संपर्कासाठी फोन क्रमांक देणं मात्र बंधनकारक आहे.या वर्षी ४ मे रोजी भुजबळ यांना जामीन देण्यात आला होता. त्यावेळेस त्यांना घालण्यात आलेल्या अटींपैकी एक अट म्हणजे मुंबईबाहेर जाताना त्यांना कोर्टाची पूर्व परवानगी बंधनकारक करण्यात आली होती. भुजबळ यांनी ती अट शिथील करण्यात यावी यासाठी अर्ज करताना आपण एक आमदार असून आपल्याला आपल्या राजकीय आणि  सामाजिक कार्यासाठी सतत मुंबईबाहेर जावं लागतं, तसंच आपातकालीन परिस्थितीत बाहेर जाण्याची वेळ येऊ शकते असं म्हटलं होतं.तसंच आपण महात्मा फुले समता परिषदेचे सदस्य असून त्यासाठी राज्याबाहेर जावं लागतं असं म्हटलं. त्याशिवाय आपण यापूर्वी ८ वेळा कोर्टाची परवानगी घेऊन मुंबईबाहेर गेलो होतो याची माहितीही कोर्टाला दिली. तसंच आपल्याला अटक होण्यापूर्वी आपण परदेशात होतो आणि आपल्या विरोधात कारवाई सुरू आहे याची माहिती असतानाही आपण देशात परतलो होतो याचीही आठवण कोर्टाला करुन दिली.

भुजबळ यांची राज्याबाहेरही मालमत्ता असून हा त्यांच्या विरोधात खटला सुरू असताना ते राज्याबाहेर पूर्वपरवानगी न घेता गेल्यास खटल्याला ते प्रभावित करू शकतात अशी शंका व्यक्त केली. पण कोर्टाने भुजबळांच्या वतीनं करण्यात युक्तीवाद आलेला युक्तीवाद मान्य करत त्यांना देशात पूर्वपरवानगीशिवाय प्रवास करण्यास मान्यता दिली आहे.

Trending Now