'मुलीची लग्नासाठी इच्छा नसेल तर पळवून आणू', राम कदम यांची मुक्ताफळं

मुंबई, 04 सप्टेंबर : घाटकोपर येथील भाजपाचे आमदार राम कदम यांनी सोमवारी दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले होते. भारतातील सर्वात मोठी हंडी म्हणून आयोजित केलेल्या या उत्सवामध्ये अगदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हजेरी लावली. मात्र याच उत्सवामध्ये गोविंदांशी संवाद साधताना राम कदम यांनी महिलांसंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप राष्ट्रवादी क्राँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.'मुलीची लग्नाला परवाणगी नसेल तर तिला पळवून आणू' असं भाजप आमदार राम कदम यांनी म्हटलं आहे आणि याचाच एक व्हिडिओ आव्हाड यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवरून ट्विट करत  राम कदम यांच्यावर टीका केली आहे.राम कदम यांच्या भाषणाची क्लिप शेअर करत आव्हाड म्हणतात 'बेताल वक्तव्य करणाऱ्या भाजपा नेत्यांमध्ये आणखी एकाची भर. रक्षाबंधन, दहिकाला उत्सव या पवित्र सणांच्या दिवशी आमदाराने तोडले आपल्या अकलेचे तारे! ' ट्विटच्या शेवटच्या ओळीमध्ये त्यांनी कदम यांच्यावर टीका केली. 'कशा राहतील यांच्या राज्यात महिला सुरक्षित?' असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

 

'मुलीची लग्नासाठी इच्छा नसेल तर तिला पळवून आणू' असं राम कदम यांनी या क्लिपमध्ये म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर संपूर्ण स्तरावरून मोठी टीका होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या विद्या चव्हाण यांनीही राम कदम यांच्यावर जोरदार तोफ डागली आहे. राम कदम हेच धंदे करतात का अशा शब्दात त्यांनी राम कदम यांच्यावर टीका केली आहे.दरम्यान, यासंदर्भात आम्ही आमदार राम कदम यांना विचारलं असता माझ्या बोलण्याचा असा अर्थ नव्हता. ही माझ्या राजकीय विरोधकांची खेळी असल्याची सारवासारव  राम कदम यांनी केली.प्रत्येक मुला आणि मुलीने आपल्या आई-वडिलांचा मान राखला पाहिजे असंच मी म्हटलो असल्याचं राम कदम यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर या वक्तव्यामुळे जर कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील त्याबद्दल मी माफी मागतो असंही राम कदम म्हणाले आहे. या क्रिकेटरने सानिया मिर्झाची काढली छेड, होऊ शकते आजीवन बंदी

Trending Now