'सनातन'च्या मदतीला शिवसेना, हिंदुत्ववाद्यांची अटक हे नोटबंदीसारखच फसवं - संजय राऊत

मुंबई, ता. 30 ऑगस्ट : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणाच्या कटाचा उलगडा झाला आणि त्या प्रकरणात अनेक तरूणांना अटकही केली गेली. या प्रकरणावरून सनातन संस्थेवर संशय व्यक्त होऊ लागला असतानाच शिवसेनेनं सनातन संस्थेची पाठराखण केली आहे. या प्रकरणी ज्या तरूणांना अटक केली त्यांच्याविरूद्ध ठोस पुरावे नाहीत. या मागे हिंदुत्ववाद्यांना बदनाम करण्याचा कट आहे अशी प्रतिक्रीया खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलीय. नोटबंदी जेवढी फसवी होती तेवढीच फसवी या तरूणांचं अटकसत्र आहे. नजर कैदेत असलेल्या नक्षलवादी समर्थकांच्या कुटुंबियांना अनेक पक्षाचे नेते भेटणार आहेत असं म्हणतात. या नेत्यांना आवाहन आहे की जे हिंदुत्ववादी म्हणून पकडले आहेत त्यांच्यावर काही अन्याय झालाय का ? यासाठी त्यांच्या कुटुंबियांना जाऊन त्यांनी भेटलं पाहिजे असंही राऊत यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अशी भेट घेणार असल्याचं वक्तव्य केलं होतं.सामनातल्या अग्रलेखातही उद्धव ठाकरे यांनी सनातन आणि हिंदुत्ववादी संघटनांची जोरदार पाठराखण केली.काय आहे 'सामना'च्या अग्रलेखात

आरोप असेल तर सिद्ध करासनातन’ नामक संस्थेने पानसरे, दाभोलकर, लंकेश, कलबुर्गी मंडळींचे खून केले व त्याबद्दल या संस्थेवर बंदी आणावी अशी मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. मग तशी बंदी आधीच घालून सरकारने या सर्व मंडळींना जेरबंद का केले नाही, हा प्रश्न आहेच. आता जे लोक पकडले ते सर्व ‘सनातन’चे असल्याचे बोलले गेले, पण यापैकी एकही व्यक्ती आमची साधक नाही, असल्यास सिद्ध करा असे आव्हान ‘सनातन’च्याच मंडळींनी दिले आहे. त्यामुळे नेमके सत्य काय आहे याबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाले व सध्या तरी ‘एटीएस’ सांगेल तेच खरे असे मान्य करावे लागत आहे.पुन्हा या सर्व मंडळींना अनेक प्रमुख व्यक्तींना उडवायचे होते, असेही सांगितले जात आहे. आता या प्रमुख व्यक्ती कोण, हा प्रश्नही उपस्थित झाला आहे. दरम्यानच्या काळात पंतप्रधान मोदी यांच्याही जीवाला धोका आहे आणि तसा कट रचला जात असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. त्याची संशयाची सुई माओवाद्यांकडे असल्याने माओवादी लोकांवर धाडी पडल्या. अर्थात माओवाद्यांकडे फक्त धमक्यांची पत्रे व कागदपत्रे सापडली, पण हिंदुत्ववाद्यांकडे मात्र बॉम्ब, बंदुका, स्फोटके सापडली.पुन्हा जे नक्षलवादी समर्थक मान्यवर आता पकडले गेले आहेत त्यांना ‘कथित’ नक्षलवादी समर्थक म्हटले जात आहे आणि अटकेत असलेल्या हिंदुत्ववादींचा उल्लेख मात्र थेट ‘हिंदू कट्टरपंथीय’ असा केला जात आहे. मुळात पानसरे, दाभोलकर, लंकेश, कलबुर्गी यांच्या हत्येमागे समान धागा आहे काय हे सिद्ध व्हायचे आहे.यापैकी प्रत्येक जण स्वतंत्र विचारांचा होता व हे सर्व लोक कम्युनिस्ट किंवा समाजवादी विचारसरणीचे होते. प्रत्येकाची हत्या हा स्वतंत्र कट असू शकतो. यापूर्वी समीर गायकवाड नामक तरुणास पानसरे हत्या प्रकरणात पकडण्यात आले. त्याच्यावर आरोपपत्रही दाखल केले गेले.

VIDEO : चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये दोन तरुणींचा दारू पिऊन धिंगाणा

Trending Now