आंध्र, राजस्थानात पेट्रोलचे भाव कमी झाले महाराष्ट्रात काय होणार?

News18 Lokmat
मुंबई,ता.10 सप्टेंबर : राजस्थान नंतर आता आंध्र प्रदेश सरकारनेही पेट्रोल आणि डिझेलवर लागणाऱ्या टॅक्समध्ये कपात केलीय त्यामुळं मंगळवारपासून आंध्र प्रदेशात पेट्रोल आणि डिझेलच्या भावात दोन रूपयांची कपात होणार आहे. आंध्रचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी आज ही घोषणा केली. राजस्थान मध्ये लवकरच निवडणुका होणार आहेत तर आंध्र प्रदेशातही निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत त्या पार्श्वभूमीवर लोकांमधली नाराजी दूर करण्यासाठी दोनही राज्य सरकारांनी तातडीनं हा निर्णय घेतलाय. महाराष्ट्रातले पेट्रोल डिझेलचे भाव देशात सर्वात जास्त असल्याचं मानलं जातंय असं असतानाही राज्य सरकार पेट्रोल आणि डिझेलवरच्या टॅक्समध्ये कपात का करत नाही असा सवाल आता विरोधी पक्ष विचारत आहेत.आंतरराष्ट्रीय बाजारात वाढणाऱ्या कच्च्या तेलाच्या किंमती, घसरणारा रूपया यामुळं तेलाच्या किंमतीत देशात सातत्यानं वाढ होतेय. पेट्रोल आणि डिझेल हे जीएसटीमध्ये येत नसल्याने त्यावरचे टॅक्स हे चढेच आहेत. तेलावरच्या टॅक्स मधून येणारं उत्पन्न हे राज्य आणि केंद्र सरकारच्या महसूलातला सर्वात मोठा हिस्सा आहे.कमी होणारे उत्पन्नाचे स्त्रोत आणि वाढणारा खर्च याचा मेळ बसवताना सरकारच्या नाका तोंडाला फेस येतोय. लोकप्रिय घोषणांमुळे सरकारी पैशाचा मोठा हिस्सा हा त्या योजनांवर खर्च होते. आता हा टॅक्स कमी केला तर तिजोरीत खडखडाट होईल ही भीती सरकारला आहे.

गुजरात आणि कर्नाटक विधानसभा निवडणुकीआधी पेट्रोलचे दर स्थिर होते. निवडणुका झाल्यानंतर लगेच तेलाच्या दरांमध्ये वाढ झाली. केंद्र सरकारच्या नावानं खडे फोडणारी राज्य सरकारं मात्र आपल्या अधिकारातला टॅक्स कमी करायला तयार नाहीत. तेलाच्या भावाचं गणित हे असं गुंतागूंतीचं असल्याने या भाववाढीवर दिर्घकालीन उपाय नसल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.इतर राज्यातल्या निवडणुका काही महिन्यांवर येवून ठेपलेल्या असताना महाराष्ट्रातल्या निवडणुकांना अजुन वर्षभराचा कालावधी आहे. त्यामुळं टॅक्स कमी करण्याचा निर्णय सरकार घेणार नाही अशी शक्यता व्यक्त करण्यात येतेय. तेलाचे भाव कमी करण्यासाठी राज्य सरकार विविध पर्यायांवर विचार करत असल्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते.मात्र टॅक्स कमी करून सामान्य नागरिकांना दिलासा देण्याचं धाडस राज्य सरकार दाखवणार का हा खरा प्रश्न आहे. तर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींवरचं सरकारी नियंत्रण हटविल्याने आता किंमतीवर आमचं नियंत्रण नाही असा दावा केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केलाय. त्यामुळं सध्यातरी तेलाच्या किंमती कमी होणार नाही अशी शक्यता व्यक्त करण्यात येतेये. भारत बंद : आंदोलनाला गेले आणि थोबाडीत खाऊन आले, VIDEO व्हायरल!

Trending Now