आज संघाच्या व्यासपीठावरून मुखर्जींचं भाषण,साऱ्या देशाचं लक्ष

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष वर्गाच्या समारोपासाठी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी उपस्थित राहणार आहेत. गेली अनेक दशके काँग्रेसमध्ये काम केल्याने कॉंग्रेसच्या विचारधारेतून घडलेले प्रणव मुखर्जी यावेळी स्वयंसेवकांना नेमके काय मार्गदर्शन करणार याकडे देशाचे लक्ष लागले आहे.

Sonali Deshpande
नागपूर, 07 जून : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष वर्गाच्या समारोपासाठी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी उपस्थित  राहणार आहेत. गेली अनेक दशके काँग्रेसमध्ये काम केल्याने कॉंग्रेसच्या विचारधारेतून घडलेले प्रणव मुखर्जी यावेळी स्वयंसेवकांना नेमके काय मार्गदर्शन करणार याकडे देशाचे लक्ष लागले आहे. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हेदेखील यावेळी वर्गाला मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमानंतर स्मृतिमंदिरातच प्रणव मुखर्जी हे सरसंघचालक आणि संघाच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांसमवेत भोजनदेखील करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. रेशीमबाग मैदानावर संध्याकाळी ६.३० वाजता कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे.रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसरात १४ मेपासून संघाच्या तृतीय वर्ष संघशिक्षा वर्गाची सुरुवात झाली. यंदाच्या संघशिक्षा वर्गात ७०८ तरुण स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. या शिक्षार्थ्यांना प्रणव मुखर्जी आणि डॉ मोहन भागवत हे  मार्गदर्शन करतील. कॉंग्रेससह विरोधी पक्षातील विविध नेत्यांकडून मुखर्जी यांच्या संघाच्या निमंत्रणाच्या निर्णयाबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात आले. मात्र विरोधानंतरदेखील प्रणव मुखर्जी आपल्या निर्णयावर ठाम होते व नागपुरात ते नेमके काय भाष्य करतील, याकडे देशाच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.एरवी संघाचे वरिष्ठ पदाधिकारी अतिथींच्या स्वागताला जात नाहीत. मात्र संघाचे सहसरकार्यवाह व्ही. भागय्या यांनी स्वत: त्यांचे विमानतळावर जाऊन स्वागत केले. यावेळी संघाचे महानगर संघचालक राजेश लोया उपस्थित होते. दरम्यान, प्रणव मुखर्जी यांच्या स्वागतासाठी कॉंग्रेसचे नेतेदेखील येतील, असा अंदाज वर्तविण्यात येत होता. मात्र एकेकाळी कॉंग्रेसचे दिग्गज नेतृत्व राहिलेले तसेच राष्ट्रपतिपद भूषविलेल्या मुखर्जी यांच्या स्वागताला एकही कॉंग्रेस नेता किंवा पदाधिकारी फिरकला नाही. त्यांच्या नागपूर आगमनाकडे कॉंग्रेसने पाठच फिरविल्याने उपस्थितांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते.

Trending Now