भाजपला टक्कर देण्याची ताकद फक्त काँग्रेसमध्येच -शरद पवार

"नरेंद्र मोदींमध्ये काम करण्याची प्रचंड ऊर्जा आहे. धडाडी आहे. ही धडाडी त्यांना गुजरातमध्ये कामी आली. पण राज्य चालवणं आणि देश चालवणं यात फरक आहे"

Sachin Salve
पुणे 21 फेब्रुवारी : सगळ्या महाराष्ट्राचं लक्षं लागलेली शरद पवारांची मुलाखतही तेवढीच रंगली. शरद पवार उत्तरं काय देतील त्यापेक्षा राज ठाकरे प्रश्न काय विचारतील अशी उत्सुकता सगळ्यांनाच होती. आक्रमक, बेधडक आणि बोचऱ्या बोलण्यासाठी राज ठाकरे प्रसिद्ध तर मुत्सद्दी, मिश्किल आणि अनेक अर्थ निघू शकतील अशा धोरणी वक्तव्यांची पवारांची ख्याती. या दोनही गोष्टींचा प्रत्यय आज पुण्यात झालेल्या मुलाखतीत आला आणि ही मुलाखत उत्तरोत्तर रंगत गेली. मुलाखतीच्या शेवटी राज ठाकरेंनी शरद पवारांचं व्यंगचित्र रेखाटलं आणि शब्दांनी सुरू झालेली ही मुलाखत कुंचल्यांच्या रेषांनी संपली.राज्य चालवणं आणि देश चालवणं यात फरक, मोदींना टोलानरेंद्र मोदींमध्ये काम करण्याची प्रचंड ऊर्जा आहे. धडाडी आहे. ही धडाडी त्यांना गुजरातमध्ये कामी आली. पण राज्य चालवणं आणि देश चालवणं यात फरक आहे. देश चालवाना सगळ्यांना विश्वासात घ्यावं लागतं. मोठी टीम बांधावी लागते. मोठं मन लागतं या गोष्टी मोदींमध्ये नाहीत. संसदेत त्यांनी पंडित नेहरूंवर केलेले व्यक्तिगत आरोप अतिशय अयोग्य होते. अशा गोष्टींमुळं देश चालू शकत नाही. माझी करंगळी धरून ते राजकारणात आले यात काहीच तथ्य नाही.

'राहुल गांधी बदलताय'राहुल गांधी आता बदलत आहेत. नव्या गोष्टी शिकण्याची त्यांची तयारी आहे. ते तसा प्रयत्नही करताहेत ही चांगली गोष्ट आहे. देशात समर्थ विरोधीपक्षाची गरज आहे. ही गरज आज फक्त काँग्रेसच पूर्ण करू शकते. भाजपला टक्कर देण्याची ताकद फक्त काँग्रेसमध्येच आहे, यात काहीच शंका नाही.'बाळासाहेब ठाकरे मोठ्या मनाचा माणूस'बाळासाहेब ठाकरे आणि माझ्यात टोकाचे मतभेद होते. आम्ही टीकाही तशीच केली. पण वैयक्तिक जिव्हाळा होता. सुप्रिया सुळे लोकसभा निवडणुकीला उभी राहिल्यावर बाळासाहेबांनी उमेदवार दिला नाही आणि भाजपलाही समजावलं. त्यांनी जात पात कधीच मानली नाही. कर्तृत्वाला ते किंमत देत असतं. महाराष्ट्राचे ते मोठे नेते होते. त्यामुळेच यशवंतराव आणि बाळासाहेब गेल्यानंतर ती गोष्ट मनाला फार लागली होती.'तुम्ही देव मानता का?'लौकीक अर्थानं मानत नाही. पण पंढरपूरला गेल्यावर विठ्ठलाच्या दर्शनाने समाधान मिळतं. तुळजाभवानी, गणपतीपुळ्याचा गणपती यांच्या दर्शनाने मनाला प्रसन्न वाटतं. ज्या ठिकाणी लाखो लोकांची श्रद्धा आहे त्याचा आदर केला पाहिजे.मुंबई महाराष्ट्रापासून तुटणार?बुलेट ट्रेनमुळं मुंबईत गर्दी वाढणार आहे. बुलेट ट्रेन करायचीच होती तर दिल्ली मुंबई का नाही? मुंबईत गुजराती भाषेचं आक्रमण वाढतेय ही चिंतेची बाब. मात्र मुंबई महाराष्ट्रापासून कुणीही तोडू शकणार नाही.वेगळ्या विदर्भाबाबत काय?वेगळ्या विदर्भाची मागणी ही फक्त तीन चार जिल्ह्यांपूरतीच आहे. त्याचं नेतृत्व हिंदी भाषिक नेत्यांकडे आहे. सामान्य लोकांचा या मागणीला पाठिंबा नाही. लोकांना वेगळा विदर्भ पाहिजे असेल तर लोकांचं मत जाणून घेतलं पाहिजे ही आमची भूमिका आहे.आरक्षण आर्थिक निकषांवर पाहिजे का?गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात जातीय संघटना वाढत आहेत. मात्र ते जास्त काळ टिकणार नाही. जाती पातीच्या भिंती तोडून सर्व राजकीय मतभेद विसरून एकत्र आलं पाहिजे. आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांतील सर्वच जातींच्या लोकांना आरक्षण दिलं पाहिजे.प्रत्येक वेळी शाहू, फुले आंबेडकरच का?कारण यांचा विचार हा समाज जोडणारा आहे. सध्याच्या कलूषित वातावरणात या महान नेत्यांचा विचारच समाजाला तारणारा आहे. त्यामुळं या नेत्यांच्या विचारांची आवश्यकता काल होती, आज आहे आणि उद्याही राहिल.'राज ठाकरेंमध्ये नेतृत्वाचे गुण'तुमच्यामध्ये तरूणांची फौज आहे. तरूणांना आकर्षित करण्याची ताकद आहे. या तरूणांना योग्य दिशा देण्याचं काम मात्र तुम्हाला करावं लागेल.

Trending Now