पावसानं शेतातली माती गेली, खडक राहिला, आता करायचं काय? मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांची व्यथा

मुसळधार पावसामुळे एकट्या नांदेड जिल्ह्यात तब्बल 71 हजार हेक्टरवरच्या शेतीचं नुकसान झालंय. शेतकऱ्यांची जमीन खरवडून गेलीय.

मुजीब शेख, नांदेड, ता.6 सप्टेंबर : मराठवाडा तसा दुष्काळग्रस्त विभाग म्हणून ओळखला जातो. मात्र यंदाच्या मुसळधार पावसाने अनेक जिल्ह्यातल्यातल्या शेतकऱ्यांच्या शेतातली जमीनच खरवडून गेलीय. त्यामुळं यंदाचं पीक तर हातातून गेलंय. मात्र पुढच्या वर्षी शेतात माती आणायची कुठून असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झालाय. एकट्या नांदेड जिल्ह्यात तब्बल 71 हजार हेक्टरवरच्या शेतीचं नुकसान झालंय. त्यात सर्वाधिक नुकसान झालंय ते किनवट आणि माहूत तालुक्यात. या दोन तालुक्यात मिळून 60 हजार हेक्टरवरचं नुकसान झालंय.महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमेजवळ असलेल्या मराठवाड्यातल्या किनवट तालुक्यात गेल्या महिन्यात आभाळ कोसळलं. न थांबणाऱ्या पावसानं इथल्या हजारो हेक्टर शेतीचं न भरुन येणारं नुकसान झालंय. काही तासात झालेल्या मुसळधार पावसाने पावसानं इथली जमीनच नाही तर शेतकऱ्यांची स्वप्नही खरवडून गेली आहेत.शैलेश मेश्राम या तरूण शेतकऱ्याच्या शेतातलं 4 एकर सोयाबीन पावसानं उद्धवस्त झालं. त्यातच शेतातली काळी मातीही वाहून गेल्यानं आता करायचं काय असा प्रश्न शैलेश पुढे निर्माण झालाय.

गजानन मुंडे या शेतकऱ्याकडे तीन एकर काही गुंठे शेती आहे. मुग,उडीद,सोयाबीन अशी पीकं ते घेत असतात. पावसानं त्यांच्या शेतातली दिड ते दोन फुट जमीन वाहून गेल्यानं जमीनीची भरपाई कशी करायची हा त्यांच्यापुढचा प्रश्न आहे.किनवट तालुक्यातील बोधडी इथल्या दत्ता डवरेंच्या शेतातलाही जवळपास 2 ते अडीच फूट मातीचा सुपीक थर वाहून गेलाय. तब्बल 5 एकर शेतीत आता फक्त खडक शिल्लक राहिलाय. अंगावरचं मास खरडल्याप्रमाणं त्यांच्या शेतातली सुपीक शेती वाहून गेलीय त्यामुळे कर्ज फेडणार कसं असा त्यांचा सवाल आहे.किनवट, माहूर, हदगाव या नांदेड जिल्ह्यातल्या तालुक्यांमध्येही मोठं नुकसान झालंय. शेतात माती भरली नाही तर ही शेती पुढील किमान 10 वर्ष शेतीयोग्य राहणार नाही, त्यामुळं या शेतकऱ्यांना सरकारनं तलावातला गाळ भरण्यासाठी मोठी मदत द्यावी अशी मागणी किनवटचे आमदार प्रदीप नाईक यांनी केलीय.

VIDEO : आशाताईंना वाढदिवसानिमित्त राज ठाकरे यांनी अशा दिल्या शुभेच्छा

 

Trending Now