औरंगाबादमध्ये बंद कंपन्यांमध्ये घुसून आंदोलकांनी केली तोडफोड, 50 कोटींचं नुकसान

मराठा आरक्षणासाठी काल म्हणजे 09 ऑगस्ट 2018ला दुसऱ्यांदा महाराष्ट्र बंद ठेवण्यात आला होता.

औरंगाबाद, 10 ऑगस्ट : मराठा आरक्षणासाठी काल म्हणजे 09 ऑगस्ट 2018ला दुसऱ्यांदा महाराष्ट्र बंद ठेवण्यात आला होता. या बंदला सगळ्याच ठिकाणावरून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. पण कुठेतरी या आंदोलना हिंसक वळणही लागताना दिसलं. काल मराठा आंदोलनाच्या राज्यव्यापी बंदमुळे राज्यात सर्वाधिक नुकसानीचा फटका हा औरंगाबादला बसला आहे. वाळूज औद्योगिक वसाहतीमध्ये जमावाने प्रचंड नासधूस केली आहे. वाळूजमधील स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय उद्योगांना याचा जवळपास 50 कोटींचा फटका बसला आहे.वाळूज भागातील एफ सेक्टरमध्ये जवळपास 65 ते 70 कंपन्यांची नासाधून केली आहे. झुंडीने आलेल्या जमावाने सर्वप्रथम कंपनीमध्ये लावलेल्या सीसीटीव्हीची आधी तोडफोड केली आणि त्यानंतर आतमध्ये घुसून कंप्यूटर्स ते फर्निचरपर्यंत सगळ्याची तोडफोड केली आहे. काही कंपनीच्या स्वागत कक्षाला आगी सुद्धा लावण्यात आल्या आहेत. रस्त्यावरच्या खाजगी गाड्यांनाही आग लावण्यात आल्या आहेत. यात  9 गाड्या जाळून खाक झाल्यात.बरं इतकंच नाही लावलेली आग विझवण्यासाठी आलेली अग्निशमन दलाची गाडीही जमावाने पेटवून दिली. जमावाच्या हल्ल्यातून पोलिसांच्या गाड्याही सुटल्या नाही. पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांचीही गाडी जमावाने फोडली. काल पेटलेल्या या वणव्यानंतर  आता कुठे परिस्थिती सामान्य व्हायला सुरुवात झाली आहे.

दरम्यान, उद्योग क्षेत्राला बसलेली ही झळ मराठवाड्याला परवडणारी नाही अशी भावना राम भोगले यांनी व्यक्त केली. त्यामुळे शांततेचं आव्हान केलं असतानाही त्याला हिंसक वळण कोणी दिलं याचा आता पोलिस शोध घेत आहेत.

Trending Now