जळगाव : नरभक्षक बिबट्याचा वृद्ध महिलेवर हल्ला,बळीची संख्या 6 वर

वरखेडे खुर्द इथं झोपडीत झोपलेल्या वृद्धेवर बिबट्याने हल्ला चढवला. या वृद्धेचा बळी गेल्याने बिबट्याच्या हल्ल्यातील मयतांची संख्या आता सहावर पोहोचली आहे.

Sachin Salve
जळगाव, 28 नोव्हेंबर : पाच जणांचा लागोपाठ बळी घेणाऱ्या नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचे आदेश दिल्यानंतर काही तासांत  वरखेडे खुर्द येथे झोपडीत झोपलेल्या वृद्धेवर बिबट्याने हल्ला चढवला. या वृद्धेचा बळी गेल्याने बिबट्याच्या हल्ल्यातील मयतांची संख्या आता सहावर पोहोचली आहे. यमुनाबाई तिरमली (७०) असं बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या वृद्धेचे नाव आहे.आतापर्यंत शेत-शिवारात जनावरांचा नागरीकांवर हल्ला चढवणाऱ्या नरभक्षक बिबट्याने चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे खुर्द गावातील झोपडीवजा घरात राहणाऱ्या यमुनाबाई दला तिरमली (७०) या कुटुंबातील तिघा मुलांसह झोपल्या असतानाच नरभक्षक बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढवला. घटनास्थळापासून एक ते दीड किलोमीटर अंतरावर तिरमली यांची मान आढळली तर धडाचा शोध घेण्याचे काम सुरू होते. तिघा मुलांसह गाढ झोपेत असलेल्या यमुनाबाई यांच्यावर बिबट्याने हल्ला चढवत त्यांना ओढून जंगलाकडे नेत असताना ओरडण्याचा आवाज झाल्याने कुटुंबातील सदस्य जागे झाले मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी हातात बंदूक घेत बिबट्याच्या शोध मोहिमेत सहभाग नोंदवला होता. बिबट्याचा बंदोबस्त होत नाही तोपर्यंत जिल्हा सोडणार नसल्याचे सुतोवाच त्यांनी केले होते तर मंगळवारी पहाटे सहावा बळी गेल्याने ग्रामस्थांमध्ये आणखीन रोष उफाळला आहे.

वनमंत्र्यांनी बिबट्याला ठार मारण्याचे आदेश देऊन काही तास होत नाही तोच वृद्धेचा बळी गेल्याने ग्रामस्थांच्या संयमाचा बांध सुटला आहे. निष्पापाचे नाहक प्राण जात असल्याने किमान आतातरी प्रशासन आणि वनविभागाने दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Trending Now