मुंबईत आज मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री आणि प्रतिष्ठितांची बैठक पार पडली. मराठा समाजातल्या मान्यवरांसोबत पार पडले या बैठकीत सरकार आरक्षणाबाबत सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
मुंबई, 2 ऑगस्ट : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर पसरलेलं आंदोलनाचं लोण लवकरात लवकर शमवण्यासाठी बैठकांचा सिलसिला सुरू आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांची मतं जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी सह्याद्री अतिथीगृहावर महत्त्वाची बैठक बोलावली होती. जवळपास 3 तास चाललेल्या या बैठकीला साहित्य, कला, उद्योग, कृषी, यासह इतर महत्त्वाच्या क्षेत्रातल्या दिग्गजांनी आवर्जून हजेरी लावली. मंत्र्यांपैकी चंद्रकांत पाटील, विनोद तावडे, पंकजा मुंडे, एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली. मराठा समाजाला कालबद्ध आरक्षण देण्याचा पुनरूच्चार करीत, सरकार आरक्षणाबाबत सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांसोबत अडीच तास चाललेल्या या बैठकीत, न्यायालयीन लढाईपासून ते नोकरी शोधण्याच्या मुद्यांपर्यंत उहापोह करण्यात आला. सह्याद्री अतिथीगृहात पार पडलेल्या या बैठकीत मराठा समाजाला कालबद्ध आरक्षण देण्याचा पुनरूच्चार करीत मुख्यमंत्र्यांनी सरकार आरक्षणाबाबत सकारात्मक असल्याचे स्पष्ट केले. यावेळी नोकरीच्या संधी कुठे उपलब्ध आहेत? देशविदेशात खासगी आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये कसं सामावून घेता येईल? केंद्र आणि राज्याच्या योजनांचा लाभ मराठा तरुणांना कसा देता येईल? या विषयांवर अडीच तास चर्चा करण्यात आली.